'ईव्हीएम छेडछाड झाली तर एखादा माणूस संसदेत जाईल. पण त्यामुळे संसदीय लोकशाही प्रक्रियेवर मोठा आघात होईल. यातून लोकांचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासही उडू शकतो,' असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलते होते. पवारांना या संदर्भात जेव्हा ज्या जागांवर भाजप मोदी लाटेत दावा करत नव्हते. त्या जागेवर आता भाजपचे नेते दावा करत आहेत. त्यांच्यामध्ये आता एवढं धाडसं झालेलं आहे. की, सुप्रियांना बारामती अवघड जाईल माढ्यामध्ये शरद पवारांनी उभं राहू नये. काय नक्की या मागचं गणित आहे? असा प्रश्न विचारला असता…
शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला.
'ईव्हीएम हॅक करता येतात, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. मी या विषयातला तज्ज्ञ नाही. मात्र कोणतंही बटण दाबल्यास मत भाजपालाच जातं, अशी बातमी मध्यंतरी वाचनात आली होती. भाजपा नेत्यांचे बारामतीबद्दलचे दावे पाहता, त्यांनी काही नियोजन केलंय की काय, अशी शंका येते,'
असं पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी पवार यांनी निवडणुकांवरील विश्वास जपायला हवा. त्यासाठी निवडणूक आयोगानं आवश्यक सुधारणा घडवायल्या हव्यात. लोकांचा विश्वास उडाल्यावर मग ती कोणत्याही टोकाला जातात. त्यामुळे त्यांचा विश्वास जपणं गरजेचं आहे. असं सांगत इव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजपने जोरदार ताकद लावली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर बारामती शहरात अनेक दिवस तळ ठोकून होते. त्यामुळे ही जागा जिंकण्याचा दावा भाजपकडून वारंवार करण्यात येत आहे. तसंच माढ्यातून तुम्ही उभा राहू नका, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना दिला होता. तसंच बारामती पाडली, तर त्यावर पुस्तक लिहावं लागेल असं विधान काही दिवसांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याशिवाय यंदा बारामती सुप्रिया सुळेंना जड जाईल, अशी विधानं भाजपाच्या नेत्यांकडून करण्यात आली. यावर बोलताना शरद पवारांनी ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला. त्यासाठी त्यांनी इव्हीएम बाबत वृत्तपत्रात आलेल्या बातमीचा आधार घेत हे विधान केलं आहे.