17 व्या लोकसभा निवडणुकीत जुन्या चेहऱ्यांबरोबरच नवे चेहरेही संसदेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळं या नव्या खासदारांना मोदींनी यावेळी मार्गदर्शन केलं. पहिल्यांदाच निवडून आलेल्या खासदारांना मोदींनी सर्वात महत्त्वाचा सल्ला दिला तो प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहण्याचा.
एनडीएमधील सर्व खासदार आणि नेत्यांच्या उपस्थितीत संसदेच्या नेतेपदी एकमतानं नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आलीय. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुक, त्यानंतर मिळालेलं बहुमत आणि पुढील पाच वर्षांत मोदी सरकारच्या अजेंड्यावरील विषयावर सविस्तर माहिती दिली. लालकुष्ण अडवाणी नेहमी म्हणायचे की छापणे आणि दिसणे यापासून दूर राहणं तुमच्याच फायद्याचं आहे. त्यामुळं टीव्हीवर दिसणं आणि वृत्तपत्रात छापून येण्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा सल्ला यावेळी मोदींनी नवख्या खासदारांना दिलाय. तुम्ही अनेक प्रस्थापितांना हरवून निवडून आला आहात, याचा गर्व ठेवू नका. तुम्ही मोदींमुळं नाही तर जनतेच्या आदेशामुळं निवडून आलात. त्या मतांचा सन्मान करा, असंही नरेंद्र मोदींनी सांगितले.