दाभोलकर हत्या प्रकरण : सनातनचे वकील पुनाळेकर आणि विक्रम भावेला 4 जूनपर्यंत CBI कोठडी

Update: 2019-06-01 13:01 GMT

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी लेखक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना पुणे सत्र न्यायालयाने 4 दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना २५ मे ला मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना १ जून पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज न्यायालयाने या कोठडीत ४ दिवसांची वाढ केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 ला सकाळी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान या प्रकरणी सीबीआय़ने संजीव पुनाळेकर यांचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असल्याची माहिती सरकारी वकिलांनी आज न्यायालयात दिली. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता सरकारी वकिलांनी पुनाळेकर आणि भावे यांच्या चौकशीसाठी 14 दिवस सीबीआय कोठडीची मागणी केली होती. तर दुसरीकडे बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींवरील आरोप हे जामीनपात्र असल्याचं सांगत जामीन देण्याची मागणी केली होती.

काय आहे आरोप?

सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

दाभोळकर यांची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करणे.

हत्येच्या कटामध्ये समाविष्ट असणे.

आरोपींना मार्गदर्शन करणे.

सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांच्याकडे लिपीक म्हणून कामाला असलेल्या विक्रम भावे यांच्यावर देखील खुनाच्या कटामध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

दाभोलकर कोण आहेत हे दाखवणे

दाभोलकर कोण होते याची माहिती देणे

कटात सहभागी असणे

हे गंभीर आरोप भावे या लिपीकावर ठेवण्यात आले आहेत.

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) 10 ऑगस्ट 2018 रोजी नालासोपारा येथे धाडी टाकून वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तीन हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केली होती. या धाडीत मोठ्या प्रमाणात बॉम्ब तयार करण्याचं साहित्य सापडलं होतं. त्यानंतर चौकशीत समोर आलेल्या बाबीनंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी शरद कळसकरच्या जबाबानुसार सचिन अंदुरेला अटक केली होती. या अंदुरेने दाभोळकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

Similar News