आपल्या प्रचारसभांमधून राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका करत आहेत. आपल्या सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे खोटी आश्वासन देतात हे पटवून देण्यासाठी पंतप्रधान आधी काय बोलले होते आणि आता काय बोलतात? याचे व्हिडीओ राज ठाकरे स्क्रीनवर दाखवत असून त्यातील विरोधाभास समोर आणत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर ‘लावा रे तो व्हीडिओ’ हे राज ठाकरे यांचे वाक्य चांगलंच व्हायरल झालं असून त्या संदर्भात अनेक मिम्स देखील व्हायरल झाली आहेत. मात्र, त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या सभेतील ‘आणा रे त्याला’ हे वाक्य सोशल मीडियावर चांगलंच चर्चिलं जात आहे.
राज ठाकरे यांच्या मुंबईतील काळाचौकी येथील सभेत राज यांनी 'मोदी है तो मुमकीन है' या जाहिरातीसाठी भाजपच्या आयटी सेलने वापरलेल्या फोटोतील कुटुंबालाच व्यासपीठावर आणले. या कुटुंबाच्या घरगुती फोटोचा कसा जाहिरातीत खोट्या पद्धतीने वापर झाला आहे, हे त्यांनी दाखवले आणि भाजपच्या 'मोदी है तो मुमकीन है' या कॅम्पेनची पोल खोल केली.
या अगोदर देखील राज यांनी देशातील पहिल्या डिजीटल गावाची पोलखोल
करताना भाजप सरकारच्या जाहिरातीतील मॉडेलला व्यासपीठावर आणले होते. त्यामुळे आता ‘लावा रे तो व्हिडीओ’ नंतर ‘आणा रे त्याला’ हे वाक्य सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.