हाय-होल्टेज : सोलापुरात प्रकाश आंबेडकर-सुशीलकुमारांची भेट

Update: 2019-04-13 06:56 GMT

देशाचं लक्ष लागलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही भेट अनपेक्षित असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात येत असलं तरी, दोन विरोधी पक्षाच्या उमेदवारांची भेट अनपेक्षित कशी असू शकते? असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसकडून सुशिल कुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

दरम्यान कॉंग्रेसने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

मात्र, दोन दिवसापूर्वी झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकरकरांनी सुशीलकुमार शिंदेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लगेचच ही भेट झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. येत्या 18 तारखेला सोलापूर मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यापुर्वीच हे भेट झाल्यानं सोलापूरमधील मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

Similar News