पीएम मोदी VS प्रियंका गांधी : कोणाचे पारडे ठरणार जड? ‘हे’ आहेत महत्वाचे 10 मुद्दे
सध्या वाराणसी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देऊ शकतील का? कोणाचे पारडे जड ठरणार? वाराणसीतील जनता मोदींना पुन्हा एकदा संधी देणार का? आकड्यांची गणित कोणाच्या बाजूनं झुकतात... जाणून घेऊया या दहा मुद्दयांमधून :
1) 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये 5 लाख 81 हजार 022 मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात निवडणूक लढवणारे आपचे नेते अरविंद केजरीवाल यांचा त्यांनी 3 लाख 77 हजार मतांनी पराभव केला होता. केजरीवाल यांना 2 लाख 9 हजार 238 मतं मिळाली होती.
2) तर दुसरीकडे कॉंग्रेस उमेदवार अजय राय यांना 75 हजार 614 मतं मिळाली होती. बसपाच्या उमेदवाराला 60 हजार 579 मतं मिळाली होती. तर समाजवादी पार्टीला 45 हजार 291 मतं मिळाली होती. म्हणजे सपा-बसपा आणि कॉंग्रेस यांच्या मतांची बेरीज केली असता 3 लाख 90 हज़ार 722 इतकी होते.
3) रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात सपा आणि बसपाने ज्या पद्धतीने कॉंग्रेसला मदत केली आहे. त्या प्रमाणे तीनही पक्षांच्या मतांची बेरीज जरी केली तरी ते मोदींना हरवण्यासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे प्रियंका गांधी यांना या ठिकाणाहून निवडून येण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील हे निश्चित.
4) जातीय समीकरणांचा विचार केला तर वाराणसी मतदार संघात वाणी समाजाची 3.25 लाख मतं असून ही भाजपची वोट बॅंक समजली जाते. मात्र, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे नाराज झालेल्या या समाजाने भाजपची साथ सोडल्यास या ठिकाणी मोदींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
5) वाराणसी मतदार संघात ब्राम्हण समाजाच्या मतदारांचा विचार केला असता या ठिकाणी 2.5 लाख ब्राम्हण मतं आहे. त्यातच विश्वनाथ कॉरीडोरमध्ये सर्वात जास्त ब्राम्हण समाजाची घरं गेली आहे. तसंच एससी/एसटी विधेयकामध्ये केलेल्या सुधाराणांमुळे ब्राम्हण समाज नाराज आहे. त्याचा फटका देखील या ठिकाणी भाजपला बसू शकतो.
6) या मतदारसंघात 1.5 लाख यादव समाजाची मतं आहेत. गेल्या काही निवडणुकात यादव समाज भाजपच्या मागे उभा राहत आला आहे. मात्र, समाजवादी पक्षाने कॉंग्रेसला पाठिंबा दिला तर ही मतं प्रियंका गांधी यांना मिळू शकतात.
7) वाराणसीमध्ये मुस्लीम समाजाची 3 लाखाच्या आसपास मतं आहेत. हे मतदार मोदींना हरवण्याची क्षमता असलेल्या उमेदवारामागे उभा राहतात.
8) इतर समाजाचा विचार केला तर... भूमिहार समाज 1 लाख 25 हजार, राजपूत 1 लाख, पटेल 2 लाख, चौरसिया 80 हजार, दलित 80 हजार आणि इतर मागासवर्गीय समाज 70 हजार आहे. या समाजातील काही मत जर इकडे तिकडे झाली तर मोदींना 2019 ची निवडणूक कठीण जाऊ शकते.
9) आकड्यांची गणित जर जुळली आणि सपा, बसपाचा पाठिंबा कॉंग्रेसला मिळाला आणि जातीय समीकरण जुळले तर मोदींना 2019 ची निवडणूक जड जाणार हे निश्चित आहे.
10) मोदींची जमेची बाजू म्हणजे गेल्या 5 वर्षात वाराणसी मतदारसंघात केलेली विकास कामं... या कामांना दुर्लक्षित करता येणार नाही.