मुसलमान बदल रहा हैं...

Update: 2019-04-24 08:31 GMT

देख भाई, वैसे वोट तो हम बीजेपी को करेंगे नहीं, पर मोदी का रहना जरूरी है... ‘ मालेगावच्या मध्यवर्ती बाजारात लुंगी विकण्याचं काम करणारे आरिफ भाई बोलत होते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मालेगाव मध्ये ही प्रतिक्रीया सूचक आहे.

मोदींनी आणलेल्या योजना वेगळ्या आहेत, डायरेक्ट लोकांना फायदा मिळतोय, वेळ लागेल लोकांपर्यंत पोहचायला. या आधी काही फार बरं चाललं होतं अशातला भाग नाही असं आरिफ भाई सांगतात.

मालेगाव बॉम्बस्फोटानंतर आरिफ भाईंशी माझी ओळख झाली होती. मी बॉम्बस्फोटाचं कव्हरेज करायला मालेगाव मध्ये गेलो होतो. आरिफ भाई मुळे अख्खं मालेगाव जवळून-आतून-बाहेरून बघता आलं, स्थानिक तरूणांनी ज्यावेळेला माध्यमांच्या ओबी व्हॅनवर हल्ला करून त्यांचं नुकसान केलं, आणि बाकी माध्यमांना गावाबाहेर रोखलं होतं तेव्हा आम्ही ईदगाह मैदानावर स्फोटानंतरची पहिली नमाज कव्हर करत होतो. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. झालेल्या स्फोटानंतर मालेगाव हादरलेलं होतं. या स्फोटानंतर दंगल होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण मालेगाव शांत राहिलं.

स्फोटानंतर बऱ्याचदा मालेगावला जाणं झालं पण बाहेरून बाहेरून. निवडणूक आणि साध्वी प्रज्ञा सिंहच्या भाजपा उमेदवारीच्या निमित्ताने मालेगावला जाणं झालं. मालेगाव अमूलाग्र बदललेलं जाणवलं.

मालेगाव मधल्या तरूणांशी चर्चा केल्यावर त्यांचा साध्वीच्या उमेदवारीबद्दल प्रचंड राग दिसून आला. स्फोटानंतरही मालेगावमधल्या तरूणांशी कित्येकवेळा बोललोय, त्यावेळी इथल्या तरूणांची आक्रमकता पाहिलीय.

कॅमेराची लाइट लागल्यावर होणारा गोंधळ, ओढाताण, शेरेबाजी, खेचाखेची पाहिलीय. आता इतर सामान्य वस्तीमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण असतं तसा माहौल मालेगाव मध्ये होता. कसलीच खेचाखेची नाही, संयतपणे तरूण बोलत होते. आपली भूमिका मांडत होते.

मुस्लीमांच्या विकासाबाबत सरकारने पक्षपातीपणा दाखवू नये असं सर्वसाधारण मत मुस्लीम तरूणांचं आहे. मुस्लीमांची भीती दाखवून हिंदूना घाबरवलं जातं. मात्र, आमचा व्यवसाय प्रामुख्याने कपड्याचा आहे, तसंच इतरही व्यवसाय हिंदूं शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आमचं कुणाशीच भांडण नाही, उलट आपापसात चांगलं मैत्रीचं वातावरण आहे, राजकारणामुळे सगळंच वातावरण गढूळ होतं असं मत इथल्या तरूणांचं आहे. सामान्यतः अशा प्रतिक्रीया हिंदू इलाख्यातही ऐकायला मिळतात.

मालेगाव मध्ये 2008 पेक्षा जास्त विकास दिसतोय, स्वच्छता दिसतेय. मात्र असं असलं तरी मुस्लीम भाजपाला स्वीकारायला तयार नाहीयत. मोदींनी ज्या पद्धतीने मुस्लीमांना प्रतिनिधीत्व नाकारलंय हा मुस्लीमांमध्ये चिंतेचा विषय जरूर आहे.

मोदींच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असू शकतात, पण त्यांचं काम चांगलं आहे. निर्णय घ्यायची क्षमता आहे. त्यांच्या समोर ठोस विरोधक नाही. सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात ठेवल्यायत असं इथले स्थानिक नेते अश्रफी सांगतात.

काहीशा अशाच प्रतिक्रीया महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ऐकायला मिळाल्या. नरेंद्र मोदींच्या कामाच्या पद्धतीवर अनेकजण खूष दिसले. नोटबंदीचा सगळ्यात मोठा फटका लघु-मध्यम उद्योग तसंच सामान्य कष्टकऱ्यांना बसला. नोटबंदीच्या पाठोपाठ जीएसटी आणि ऑनलाइन व्यवहारांमुळे खासकरून मुस्लीमांच्या व्यवसायांवर परिणाम झाला आहे.

मुर्तिजापूर मध्ये आम्ही काही मुस्लीमांशी चर्चा केली, त्यावेळी नरेंद्र मोदींच्या निर्णयांमुळे आपला धंदा बसला असं एका हॉटेलचालकानं सांगितलं. तर छोटं-मोठं प्लंबिंग-बांधकाम करणाऱ्या मजूरांनी तर अजून पर्यंत आपल्या रोजगाराची गाडी लाइनवर आली नसल्याचं सांगीतलं. नोटबंदीनंतर मोठा फटका बसला, पण त्याच्या मागे निश्चितच काही तरी मोठं राजकीय कारण असेल. त्याशिवाय मोदींनी असं केलं नसेल असं मानणाऱ्यांचा ही एक मोठा वर्ग आम्हाला सापडला. विदर्भातील मुस्लीमांनी तर मोदींच्या धोरणांवर प्रचंड टीका केली आहे. मोदींना हुकूमशहा मानणारा मोठा वर्ग आहे, तरी ही व्यापक अर्थाने यातलं कुणी मोदींना भ्रष्ट मानायला तयार नाही.

यंदा देशभरातील मुसलमान भाजपेतर पक्षांना मतदान करतील, खास करून काँग्रेसला, असं अनेक मुस्लीम नेते सांगताना दिसत आहेत. मोदींची जहाल हिंदुत्ववादी प्रतिमा, लोकसभेच्या तिकीट वाटपामध्ये मुस्लीमांना नाकारलेलं प्रतिनिधीत्व, गोध्रा-कांड यामुळे मुस्लीमांची अशी भावना असणं साहजिकच आहे, तरी सुद्धा मोदींबद्दल मुस्लीमांमध्ये आधी दिसत असलेला पराकोटीच्या तिरस्काराची जागा काही ठिकाणी सहानुभूतीने घेतल्याचं चित्र दिसून येतंय.

मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लीमांचं नसणं, भाजपामधल्या मुस्लीम नेत्यांना काडीचीही किंमत न देणं, मुस्लीमांविरूद्ध गरळ ओकणं यामुळे मोदींवर मुस्लीमांचा राग आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कामाच्या पद्धतीवरचं समाधान या समांतर पटऱ्यांवर मुस्लीमांची मते आहेत. येत्या काळात पद्धतशीर मोहीम राबवून भाजपा या काठावरच्या मुसलमानांना आपल्याकडे वळवून घेऊ शकते. पारंपारिक मतदार म्हणून मुस्लीमांकडे बघण्याच्या सेक्युलर म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांच्या पारंपारिक गणितांना हा एक मोठा हादरा असू शकतो.

Full View

Similar News