भाजपची अजेंडा सेटींग ?

Update: 2019-03-31 04:19 GMT

लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात आपला अजेंडा सेट करण्यासाठी एक रणनीती ठरवलीय. त्यानुसार दररोज सकाळी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे हे पत्रकार परिषद घेतात. खास इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येते. या आधी भाजपाची दैनंदिन पत्रकार परिषद दररोज संध्याकाळी ४-४.३० च्या आसपास घेण्यात येत होती. मात्र सकाळी सकाळी आपण अजेंडा सेट केला तर इतर पक्ष दिवसभर त्या अजेंड्या मागे धावत बसतील यासाठी भाजपाने सकाळची पत्रकारपरिषद सुरू केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून अजूनही माध्यमांसाठी कुठल्या प्रकारची रणनीती आखल्याचं दिसत नाही.

२२ मार्चपासून भाजपनं महाराष्ट्रात माध्यमांसाठी पत्रकार परिषद घ्यायला सुरूवात केली. त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील एक मंत्री दररोज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या खात्याविषयीची माहिती देत आहेत. पहिल्याच दिवशी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर २३ मार्चपासून शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी सकाळी ९ ते ११ या वेळेत नियमितपणे पत्रकार परिषद घ्यायला सुरूवात केलीय. तावडेंनी त्यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत ५६ इंच विरूद्ध महाआघाडीच्या ५६ पक्ष-संघटनांवरच टीका केली. त्यानंतर तावडेंनी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या. पत्रकार परिषदेच्या आधीच्या दिवशी विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवर तावडे उत्तरं देतात किंवा त्यांच्या भाजपशी संबंधित माहिती देतात. त्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर स्पष्टीकरण देतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोलापूरच्या सभेत पुलवामा घटनेसंदर्भात पाकिस्ताननं भारताचे ४० दहशतवादी मारले या वादग्रस्त वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारलं. त्यावर दानवेंनी या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे, भाजपप्रेमी दानवेंविरोधातल्या ट्रोलिंगला उत्तर देतील असं मोघम उत्तर तावडेंनी दिलं.

भाजप सत्तेत आल्यापासून माध्यमांवर दबाव - सचिन सावंत, प्रवक्ते, काँग्रेस –

भाजपसत्तेत आल्यापासून माध्यमांवर एक प्रकारचा दबाव आहेच. माध्यमांच्या स्वायत्ततेबद्दलचा भाजपाचा दृष्टिकोन चांगला नाही. पत्रकार परिषद घेणं योग्य आहे. त्यामुळं भाजप माध्यमांचा अजेंडा सेट करतंय, असं वाटत नाही.

चर्चेत राहण्यासाठीच भाजपच्या पत्रकार परिषदा - नवाब मलिक, प्रवक्ते

राष्ट्रवादी काँग्रेस देशात भाजपचा प्रचार कॅम्पेनलाच प्रतिसाद मिळत नाहीये, म्हणून चर्चेत राहण्यासाठी भाजपकडून दररोज पत्रकार परिषद घेतली जात आहे. पाच वर्षे सतत भाजपचे लोकं बोलतच राहिले. त्यामुळं आता लोकं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच देत नाहीत. माध्यमांवर दबाव किती आहे हे जनतेला माहिती आहे, लोकं उघडपणे बोलत आहे. ज्या पद्धतीनं माध्यमं विरोधी पक्षांना प्रश्न विचारत आहेत, त्याप्रमाणात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत नाहीत, त्यातून सिद्ध होतंय की माध्यमांवर किती दबाव आहे.

Similar News