मी संत नाही.... राजू शेट्टींचा नवा एल्गार

Update: 2019-05-27 14:17 GMT

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. शेतक-यांशी आपली नाळ जोडली असताना झालेला पराभव धक्कादायक असल्याचं सांगत राजू शेट्टी व्यथित झालेयत. मात्र आपल्याला पराभव मान्य असल्याचं सांगत त्यांनी आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिलीय. त्यांनी ही कविता फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट केली असून या कवितेच्या माध्यमातून त्यांनी नवा एल्गार करण्यासाठी शेतक-यांना आवाहन केलंय. त्य़ाची ही कविताच इथे देत आहोत.

आजपासून..

मी संत नाही शांत आहे

गोतावळ्यातून दुरावलो

याची मनात खंत आहे

कट करून गाडलेल्या

बळीचा मी पुत्र आहे

" ज्याला फळं.. त्यालाच दगडं.."

हे जगाचं सूत्र आहे..

मी खचलो नाही

थोडासा टिचलो आहे ..

ते कोण मला बेदखल करणार ?

मी बळीराजाच्या काळजातच

घर करून बसलो आहे ..

म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा

नवा एल्गार करू.. !

गोरगरिबांच्या हक्कासाठी

आजपासून संघर्षाचा

नवा अध्याय सुरू...!!

राजू शेट्टी

खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी तिस-यांदा निवडणूक लढवत होते. त्यांनी सत्तेत असूनही ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा दिला होता. ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने चव्हाटय़ावर आणण्यात शेट्टी यशस्वी ठरले, त्याआधारे त्यांनी जिल्हा परिषद ते लोकसभा असा राजकीय प्रवासही केला. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी डावे, समाजवादी पक्षांची साथ मिळवून दोनदा खासदार झालेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना पराभूत केले. तर, 2014 च्या निवडणूकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पराभूत केलं होतं. यावेळी मात्र त्यांना मतदारांनी नाकारलं असून एक लाखांहून अधिक मतांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळं आता नव्यानं रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी त्यांनी शेतक-यांना आवाहन केलंय.

Similar News