लोकसभा निवडणुक लढवण्याची इच्छा असलेल्या आठवलेंना भाजपनं उमेदवारी दिली नाही किंवा जागाही सोडली नाही. अशा परिस्थितीत नाराज असलेल्या आठवलेंना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा मंत्रीपद मिळेल की नाही, याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर शपथविधी सोहळ्याला काही तास शिल्लक असतांना आठवलेंना सोहळ्याला उपस्थित राहण्याचं अधिकृत निमंत्रण मिळालंय. मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळेल, याविषयी आठवले आश्वस्त होते, त्यानुसार आठवलेंना दुसऱ्यांदा राज्यमंत्रीपदासाठी निमंत्रण मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मागील सरकारमध्ये आठवले हे सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. आता त्यांना पुन्हा तेच मंत्रिपद मिळतं की, खातेबदल होतो याविषयीही उत्सुकता निर्माण झालीय. आज सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवन इथं नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्यांचा शपथविधी होणार आहे.