देशातील शेतक-यांच्या आत्महत्या आणि शेतक-यांचे विविध प्रश्न असलेल्या मतदारसंघामध्येही भाजपानं बाजी मारल्याचं चित्र दिसतंय. शेतकरी आत्महत्या आणि हमीभावाच्या मुद्द्यावर त्रस्त असलेल्या, तसेच नापिकी आणि नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त असलेल्या शेतकरी बहुल मतदारसंघामध्ये भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत अच्छे दिनचा नारा देत अशा २८२ मतदारसंघांपैकी २०६ मतदारसंघामध्ये विजय प्राप्त केला होता. अच्छे दिनचा नारा फोल ठरला असला तरी या २८२ मतदारसंघापैकी या निवडणूकीत सुमारे १८० जागा पुन्हा जिंकण्यात भाजपाला यश मिळालंय. भाजपाला शेतक-यांच्या रोषाला सामोरं जावं लागून केवळ २६ जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळं शेतकरी मोदी सरकारच्याविरोधात होता किंवा शेतक-यांच्या आक्रोशाला सामोरं जावं लागेल असं चित्र दिसत असताना भाजपानं मिळवलेल्या या जागा म्हणजे भाजपाच्या प्रचाराचं, व्यवस्थापनाचं यश आहे की शेतक-यांची मानसिकता याला कारणीभूत ठरली हा प्रश्न आहे.