अनगोळ दांपत्याकडून १५ कोटींची जागा ‘रयत’ला दान!

Update: 2019-05-13 11:04 GMT

पुण्यातील अनगोळ दांपत्याने हडपसर येथील २२ हजार चौरस फुटांचे तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. सुमारे १५ कोटी रूपयांच्या किंमतीच्या भूखंडावर रयत शिक्षण संस्था कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे.

डॉ. मालती महावीर अनगोळ (वय ८३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांनी घेतलेला हा निर्णय प्रेरणादायी आहे. मालती अनगोळ या मुळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. ऐतवडे खुर्द येथील बाळगोंड पाटील हे त्यांचे वडील अबकारी विभागात अधीक्षक होते. मालती यांना सात बहिणी व तीन भाऊ होते. त्या सर्वांत थोरल्या तर कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. साधना झाडबुके या कनिष्ठ आहेत. मुलींच्या शिक्षणाविषयी फारसे गांभिर्याने घेतले न जाण्याचा तो काळ होता. तेव्हा कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने मालती यांनी जे. जे. स्कूल आफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर झाल्या. पुढे मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अधिशाखेच्या प्रमुखही बनल्या. इतकेच नाही तर स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांचे पती पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्समधील अग्रणी होते. महावीर अनगोळ यांना सौर ऊर्जा प्रकल्पात त्यांना विशेष रुची होती. याबाबतचे तंत्रज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जावे यासाठी त्यांनी काही अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी हडपसरमधील ही जागा १९९८ साली खरेदी केली होती. पुढे वृद्धापकाळामुळे अनगोळ दांपत्याला कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणीचे काम जमले नाही. व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एखाद्या नामांकीत संस्थेला ही जागा द्यावी, असे त्यांनी ठरवले.

भूखंड दानाची प्रेरणा...

रयत शिक्षण केंद्राला भूखंड दान करण्यामागची प्रेरणाही तितकीच रंजक आहे. मालती यांची बहीण झाडबुके यांनी त्यांना ‘रयत’ शिक्षण संस्थेविषयी सुचविले. रयतमध्ये केवळ पारंपारिक शिक्षण दिले जात असावे असा त्यांचा समज होता. मात्र, संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील व सोलापूर येथील लक्ष्मी पेट्रोल पंपाचे मालक संजीव पाटील यांनी अनगोळ कुटुंबास ‘रयत’च्या व्यावसायिक कौशल्य विकासकामांची माहिती दिली. तेव्हा मालतीताई यांना समाधान वाटलं. आणि त्यांनी अवघ्या चार दिवसांत स्वत:च लेखी करारनामा करून जागा संस्थेच्या ताब्यात दिली.

संशोधन, नाविन्यता आणि प्रगतीसाठी सहाय्य या तत्त्वावर ‘महावीर व डॉ. मालती अनगोळ कौशल्य प्रशिक्षण केंद्र’ या जागेत सुरु होत आहे. कर्मवीर अण्णांची हिरक महोत्सवी पुण्यतिथी व ‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त नुकताच डॉ. मालती अनगोळ यांचा संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे सत्कार करण्यात आला.

दरम्यान, कर्मवीर अण्णांप्रती कृतज्ञता व्यक्त करून डॉ. मालती अनगोळ यांनी तरुण मुलांच्या हाताला व्यवसायाभिमुख काम मिळावे, यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्रासाठी ‘रयत’ला ही जागा देताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.

Similar News