अमित शहा यांच्या रोड शोवर दगडफेक, कोलकात्यात तणावाचे वातावरण

Update: 2019-05-15 03:45 GMT

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यातील रॅलीत रात्री मोठी जाळपोळ आणि तोडफोड झाली आहे. त्यांच्या ट्रकवर लाठ्या फेकण्यात आल्या आणि तृणमूलचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा वाद झाल्यानं अमित शाह यांना त्यांचा रोड शो अर्धवट सोडवा लागला आहे. अमित शाह यांच्या शो दरम्यान हॉस्टेलमधून शहा यांच्या ताफ्यावर दगडफेकही करण्यात आली. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून भाजप कार्यकर्त्यांनी हॉस्टेलच्या इमारतीला घेराव घातल्यानं हॉस्टेलमध्ये देखील मोठा तणाव निर्माण झाला आहे.

काहीही झाले तरी मी जाहीरपणे जय श्रीराम बोलणारच. ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावी, 'ममतादीदी, मी जय श्रीराम बोलतोय. कोलकत्ताला येणार आहे. हिंमत असेल तर मला अटक करा, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रत्यक्ष ममता बॅनर्जींना यांना इशारा दिला होता. त्यानंतर अमित शाह यांनी रात्री कोलकात्यात रोड शो घेतला. मात्र, या रोड शोमध्ये मोठी जाळपोळ आणि तोडफोड झाली. त्यामुळे शाह यांना ही रोड शो अर्धवट सोडावा लागला.

 

दरम्यान, या नंतर अमित शाह यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आमच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात लोकं सहभागी झाले होते, त्यामुळे तृणमूलचे कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. बंगालच्या जनतेनं ही गुंडगिरी वेळीच रोखलं पाहिजे, असं आवाहनही केलं आहे.

भाजपला उत्तर प्रदेशमध्ये जागा कमी येणार याचा अंदाज असल्याने भाजपने आपला मोर्चा पश्चिम बंगालसारख्या राज्याकडे वळवला आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी यांचा गड समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोर लावल्याने भाजपचे नेते आणि ममता बॅनर्जी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

दरम्यान लोकसभेसाठी बंगाली जनतेने विक्रमी मतदान केलं आहे. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतरही हे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे. पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा जागा आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. त्यातच २०१४ प्रमाणे २०१९ ला मोदी लाट नसल्याने भाजपला २०१९ ची निवडणूक जड जात असल्याने भाजपने पश्चिम बंगाल सारख्या राज्यातून भाजपच्या जागा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.

Similar News