निवडणूक संपताच भाजप-शिवसेना पुन्हा आमनेसामने

Update: 2019-05-03 08:05 GMT

लोकसभेची रणधुमाळी संपताच भाजप-शिवसेना मुंबईच्या नालेसफाईवरुन पुन्हा आमने सामने येण्याची चिन्ह आहेत. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी पश्चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली आहे. पावसाळ्यात मुंबई तुंबल्यानंतर मुंबई महानगर पालिकेत सत्ता असणाऱ्या शिवसेनेवर विरोधक टीका करत असतात. त्यातच यंदा पावसाळ्यात विधानसभेच्या निवडणूका असल्यामुळे भाजपने महाराष्ट्रातील लोकसभेचा टप्पा संपताच विधानसभेच्या निवडणुकीची देखील तयारी सुरु केली असल्याचं दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईमध्ये मुंबईभर नालेसफाईचे अभियान राबवणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीनंतर भाजप कामाला लागली असताना शिवसेनेचे नेते अद्याप बाहेर पडताना दिसत नाहीत.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील लोकसभा निवडणूकांमध्ये पिछेहाट झाल्याचे लक्षात येताच दुष्काळ निवारणाच्या निमित्ताने लोकांमध्ये जाऊन आपली प्रतिमा सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूकीत युती करुन लढलेली शिवसेना यामध्ये कुठेच दिसून येत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपने शिवसेनेला शह देत विधानसभेची तयारी सुरु केली असल्याचं चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

आठवण…

त्यातच २०१४ ला लोकसभा निवडणूक एकत्र लढलेले शिवसेना भाजप विधानसभेला वेगळे झाल्यामुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार का? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात असून मुंबईच्या नालेसफाईवरुन शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Similar News