ऐ, लाव रे तो व्हिडीओ… राज ठाकरेंच्या या डायलॉगपुढे सगळं कॅम्पेनच फेल

Update: 2019-04-17 16:28 GMT

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना राजकारणातील स्टाईल आयकॉन, ट्रेंड सेटर अशी बिरूदं लावली जातात. राज यांनी लोकसभा निवडणूका न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, राज यांनी मोदी-शहा यांच्याविरोधात प्रचार करण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर सभांचा धडाकाच लावलाय. राज यांच्या सभांना लाखोंची गर्दी होतेय, सगळ्याच सभा हाऊसफुल्ल होताहेत, गाजत आहेत.

गुडीपाडव्यालाच झाली सुरूवात ‘ऐ, लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याची सुरूवात

दरवर्षी गुडीपाडव्याला मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये मनसेच्यावतीनं पाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेतच राज ठाकरेंनी पहिल्यांदाच ‘ऐ, लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्य उच्चारलं आणि मग कार्यकर्त्यांनी मोदी सरकारची पोलखोल करणारे व्हिडीओ व्यासपीठावरील मोठ्या स्क्रीनवर चालवायला सुरूवात केली. हा प्रकार सर्वांसाठीच नवीन होता. राज यांचं हे भाषण सर्वार्थानं वेगळचं होतं. त्याला नेटिझन्सनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, त्यानंतर १२ एप्रिल नांदेड, १५ एप्रिलला सोलापूर, १६ एप्रिलला इचलकरंजी आणि १७ एप्रिलला सातारा इथं झालेल्या सभांमध्येही राज यांनी ‘ऐ, लाव रे तो व्हिडीओ’ हे म्हणत केंद्र-राज्य सरकारची पोलखोल केली. नांदेडच्या सभेमध्ये तर त्यांनी अमरावतीच्या हरिसाल या गावातील डिजीटलचं विकासाच्या जाहिरातीमधील लाभार्थ्यालाच व्यासपीठावर आणलं आणि मग नेटिझन्सनी मोदी-शहा यांच्यासह राज्य सरकारवरही जोरदार टीकेला सुरूवात केली. राज यांनी मोदींसह भाजपच्या नेत्यांची वक्तव्यं, फसव्या जाहिराती व्हिडीओच्या माध्यमातून दाखवायला सुरूवात केलीय. त्यामुळं मोदी सरकारची आश्वासनं, दावे यांची पोलखोल या व्हिडिओतून सुरू झाल्यानं सत्ताधारी भाजपसह एनडीएतल्या मित्रपक्षांनी जोरदार धसकाच घेतलाय. राज ठाकरेंना सुरूवातीच्या काळात अगदी दुर्लक्षित करणाऱ्या युतीच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून प्रत्युत्तर कसं द्यावं याचा मार्ग शोधून काढला आणि राज ठाकरेंनी आघाडीच्या नेत्यांवर केलेल्या टीकांचे व्हिडीओ व्हायरल करायला सुरूवात केली. मात्र, मेनस्ट्रीम मीडियासहीत सोशल मीडियावरही नेटिझन्सच्या पसंतीस राज ठाकरेच उतरले आहेत, हे विविध अँनालिटिक्सच्या आकडेवारीतूनही सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं भाजप अर्थात मोदींच्या चौकीदार असो किंवा काँग्रेसच्या निवडणूकीच्या विविध कॅम्पेन्स असोत त्या सर्वांपेक्षा अधिक प्रभावी ठरत आहेत त्या राज ठाकरेंच्या सभा. अर्थात राज यांच्या सभांचं यशापयश हे २३ मे नंतर स्पष्ट होईलच.

थप्पड से डर नहीं लगता साहब, ऐ लाव रे तो व्हिडिओ म्हटल्यावर भीती वाटते, या पोस्टला सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक ट्रेंडिंग मिळू लागलंय.

Similar News