आघाडी धर्म: विश्वजीत कदम आणि भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांची भेट

Update: 2020-12-01 09:11 GMT

आज राज्यात विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी मतदान पार पडत आहे. पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत भाजपकडून संग्राम देशमुख मैदानात आहेत. तर राष्ट्रवादीकडून अरुण लाड निवडणुकीच्या मैदानात आहेत. विशेष बाब म्हणजे ही निवडणूक कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध भाजप अशी होत आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होताना दिसत असला तरी ग्राउंड लेव्हलला महाविकास आघाडीतील घटक पक्ष इतर पक्षाला मदत करणार का? असा सवाल उपस्थित होतो आहे. कारण सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे आज काँग्रेसचे नेते आणि कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांची अचानक भेट झाली.

या दोनही नेत्यांची भेट मतदानासाठी आलेले असताना झालेली नाही. कारण विश्वजीत कदम यांचं मतदान वांगी येथे आहे. आणि संग्राम देशमुख यांचं मतदान क़डेगाव येथे आहे. त्यामुळं हे दोनही नेते मतदानाला आल्यानंतर योगायोगाने भेटले असं नाही. उभय नेत्यांची भेट मतदान केंद्राच्या बाहेरील एका कार्यकर्त्याच्या घरामध्ये झाली.

मतदानाच्या दिवशीच दोन विरोधी पक्षांचे नेते यांच्यातील भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राजकीय वर्तुळात या भेटीच्या चर्चा सुरु असताना निवडणूक ही खिलाडूवृत्तीने लढवायची असते. ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं दोनही नेत्यांकडून सांगण्यात आले.

मात्र, दोनही नेत्यांची सदिच्छा भेट मतदानाची दिवशी ते ही एका कार्यकर्त्यांच्या घरी झाल्यानं महाविकास आघाडीतील नेते आघाडी धर्म पाळणार का? अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.

Tags:    

Similar News