शरद पवार- मुख्यमंत्र्यांची भेट, महाविकास आघाडीतील कुरबुरींवर चर्चा?

Update: 2021-07-15 15:03 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार हे राज्य सरकारचे रिमोट कंट्रोल आहेत, याचा पुनरुच्चार गुरूवारी पुन्हा केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत त्यामुळे तेच रिमोट कंट्रोल आहेत, असे वक्तव्य नाना पटोले मुंबईत केले. तसेच नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरही या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते आहे. या भेटीत महाविकास आघाडीतील समन्वयावर चर्चा झाल्याची शक्यताही व्यक्त होते आहे. गेल्या दीड महिन्यात शरद पवारांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी शरद पवार यांनी त्यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच मंत्री आदिती तटकरे तसेच एकनाथ खडसे यांच्याशीही शरद पवारांनी चर्चा केली आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून त्यांच्या कामाबाबत पवारांनी माहिती घेतल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ खडसे यांच्याशी पवारांनी सह्याद्री अतिथीगृहात एकांतात चर्चा केली.

Tags:    

Similar News