पार्थ पवारांसाठी शिवसेना मावळ लोकसभा मतदारसंघ सोडणार?

Update: 2022-03-22 11:27 GMT

महाविकास आघाडीमध्ये एकत्र असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता नवीन विषयामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याला कारण ठरली आहे ती राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याची मागणी... राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेने मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा अशी मागणी केली आहे.

पोस्टमध्ये काय म्हटले आहे?

"मला पार्थ अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे करायची आहे. ज्याप्रमाणे युवानेते, राज्याचे पर्यटन मंत्री मा. आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीमधून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या कामाचा आवाका आज महाराष्ट्र पाहतोय. त्याप्रमाणे पार्थदादांनाही एक फेअर चान्स मिळाला पाहीजे. मावळचे माननीय खासदार श्रीरंग बारणे हे संसदरत्न खासदार आहेत. त्यांच्या कामाची चुणूक आपण सर्वांनीच पाहिली आहे. महाविकास आघाडीने ठरविल्याप्रमाणे पुढील निवडणूक आघाडी लढणार आहे. त्यामुळे मावळची जागा ही पार्थ अजित पवार यांना देऊन बारणे यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवावे. २००५ साली जेव्हा सन्माननीय सुप्रीयाताई राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेबांनी मा. सुप्रियाताईंना बिनशर्त पाठिंबा दिला होता. आज तोच दिलदारपणा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दाखवावा, असे माझ्या सारख्या एका सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला वाटते. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार हे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांची प्रकृती लक्षात घेता कोणतीही तक्रार न करता राज्याचा कारभार हाकत आहेत. त्यांच्यासोबत मा. आदित्यजी ठाकरे देखील उत्तम काम करत आहेत. आता पार्थ अजित पवार यांना लोकसभेत पाठवून पवार आणि ठाकरे कुटुंबाच्या पुढच्या पिढीला एकत्र काम करण्याची संधी मिळावी." असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

शिवसेनेची भूमिका काय?

या मागणीवर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "लोकसभा निवडणुकीला अजून 2 वर्ष बाकी आहेत.त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा करून राष्ट्रवादीने संभ्रम निर्माण करू नये" असे बारणे यांनी म्हटले आहेत. मावळ लोकसभेची जागा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मागण्यात येत असली तरी यामागील कर्तेधर्ते वेगवेळेच असून त्यांचा शोध घेण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेला डिवचण्याचे काम राष्ट्रवादी करत असेल तर त्यांना देखील शिवसेना त्याच पद्धतीने उत्तर देईल असेही बारणे यांनी म्हटले आहे. पण त्याचबरोबर मावळच्या जागेबाबत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलं. ते जालना इथे पत्रकारांशी बोलत होते.

Tags:    

Similar News