Sanjay Raut संजय राऊत म्हणतात, न्याय मेलेला नाही, काही न्यायमूर्ती रामशास्त्री बाण्याचे

Update: 2023-08-04 10:10 GMT

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गुजरातच्या सूरत न्यायालयानं दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिलीय. त्यामुळं राहुल गांधींना मोठा दिलासा मिळालाय. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिय उमटण्यास सुरूवात झालीय.

२०१९ मध्ये कर्नाटकमधील एका सभेत राहुल गांधींनी “सभी चोर मोदी कैसे” असं वक्तव्यं केलं होतं. त्यामागे पार्श्वभूमी सांगतांना नीरव मोदी, ललित मोदी यांच्या भ्रष्टाचाराचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला होता. दरम्यान, सूरत च्या न्यायालयानं राहुल गांधी यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्या स्थगिती देतांना सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की, यापेक्षा कमी शिक्षा सुनावता आली असती, दरम्यान या निर्णयानंतर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय ते म्हणाले, “ “सर्वोच्च न्यायालयात न्याय जिवंत आहे. न्याय मेलेला नाही. काही न्यायमूर्ती रामशास्त्री बाण्याचे आहेत. राहुल गांधींना कोणत्या कारणासाठी शिक्षा ठोठावण्यात आली होती ? हे कळत नाही. आमच्यावरही असंख्य मानहानीचे खटले आहेत,” असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत यांनी भाजपचं नाव न घेता टीका केलीय. ते म्हणाले, “ राहुल गांधींची खासदारकी ठरवून रद्द करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षात राहुल गांधींकडून ज्या पद्धतीने हल्ले करण्यात आले, ‘भारत जोडो’च्या माध्यमातून देशाचं वातावरण ढवळून काढलं. २०२४ साली राहुल गांधी आपली सत्ता उलथवतील म्हणून, उच्च न्यायालयाला हाताशी धरून राहुल गांधींना शिक्षा सुनावली गेली. पण, मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Tags:    

Similar News