Baramati leadership : आता बारामतीचा वारसदार कोण ?
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रासह बारामतीपुढे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे बारामतीचा वारसदार कोण? पवार कुटुंबातील कुणी की कुटुंबाबाहेरील नवा चेहरा बारामतीचं नेतृत्व करणार ?
Who will lead Baramati after Ajit Pawar पवारांची बारामती आणि बारामतीचे पवार हे समीकरण मागील ६० वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रासह देशानं अनुभवलंय. Sharad Pawar शरद पवारानंतर अजित पवारांनी बारामती या विधानसभेचं प्रतिनिधीत्व करायला सुरुवात केली. अनेक चढउतार आले तरी बारामतीच महत्त्व कमी झालं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणूकीत बारामतीनं पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत अनुभवलीय. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर आता बारामतीचा वारसदार कोण ? हा प्रश्न निर्माण झालाय.
शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला ७० च्या दशकात सुरुवात झाली. त्यावेळी शरद पवारांचे मोठे बंधु हे शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते. मात्र, तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या संघटन कौशल्यानं त्यांनी पक्षनेतृत्वाचा विश्वास संपादन केला अन् १९६७ मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर चार वेळा मुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रिपदंही त्यांनी भूषविलं. त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाची सूत्रं एकप्रकारे अजित पवारांकडे सोपवत शरद पवार देशाच्या राजकारणात लक्ष घालू लागले.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थानं अजित पवार हे पुर्वीपेक्षा बारामतीत अधिक लक्ष देऊ लागले. जुन्या-नव्या दमाच्या कार्यकर्ते-नेत्यांची फळी त्यांनी उभी केली, त्यांना ताकद दिली. त्यामुळं बारामतीमधल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलं. दरम्यानच्या काळात शरद पवारांनी राज्यसभेचा मार्ग निवडल्यानं त्यांच्या जागी सुप्रिया सुळे या लोकसभेवर निवडून गेल्या. त्यामुळं अजित पवारांच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला उभारी मिळाली. राज्याचा कारभार करतांना त्यांनी नियमितपणे बारामतीवर लक्ष ठेवल्यानं बारामतीकरांशी त्यांची नाळ अधिकच घट्ट होत गेली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाचा कस लागणार अशी शक्यता वर्तवली जात होती. कारण त्यांचा सामना हा थेट शरद पवारांशीच होता. त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. कारण सुप्रिया सुळेंच्या समोर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून यांनी आव्हान उभं केलं होतं. त्यात सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. दरम्यान, महायुतीला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून अपेक्षित यश लाभलं नाही. बारामतीकरांनीही पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत अनुभवली. त्यानंतर सुनेत्रा पवार या राज्यसभेवर निवडून गेल्या. त्यापाठोपाठच्या विधानसभा निवडणुकीतही दुसऱ्यांदा पवार विरुद्ध पवार या लढाईचे बारामतीकर साक्षीदार झाले. या निवडणुकीत नवख्या युगेंद्र पवारांचा अनुभवी अजित पवारांनी सहज पराभव केला. त्याचवेळी बारामतीचा वारसदार कोण ? अशी चर्चा उघडपणे सुरु झाली होती. मात्र, बारामतीकरांनी विधानसभेला अजित पवारांच्या पारड्यात आपलं प्रेम टाकलं.
दरम्यान, आज अजित पवारांचं अकाली निधन झालं. त्यामुळं पुन्हा बारामतीचा वारसदार कोण ? अशी चर्चा सुरु झाली आहे याविषयी ज्येष्ठ राजकीय पत्रकार राही भिडे सांगतात की, आता अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होईल. तर दुसरीकडे रोहित पवारही आहेत. आणि रोहित पवार यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचं चांगलं पाठबळही त्यांना आहे. ही सर्व परिस्थिती पाहता आता कुटुंबातच नेतृत्वाची स्पर्धा सुरु होईल असं मला वाटतं. तसेच आता संबंध महाराष्ट्रात, बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात सहानूभूतीचं वातावरण आहे आणि या सहानुभूतीचा पुरेपुर उपयोग करून येणाऱ्या काळात त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. दुसरीकडे कुटुंबाच्या पलिकडे आपण पाहिलं तर सुनिल तटकरे हे अजित पवार यांच्या जवळचे आणि त्यांच्याच नेतृत्वात घडलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ते चांगलच नेतृत्व करू शकतात असं मला वाटत.
एकंदरितच वारदाराबाबत चर्चा येणाऱ्या काळात आणखी प्रकर्षाने होतील परंतु सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार का ? असं न झाल्यास पार्थ पवार, जय पवार की सुनेत्रा पवार यापैकी कोण बारामतीचं नेतृत्व करणार ? किंवा युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे या दोघांपैकी एकजण नेतृत्व करणार ? किंवा पवार कुटुंबातील दुसरा नवा चेहरा बारामतीचं नेतृत्व करणार ? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील.