Maratha Leadership : सर्वमान्य मराठा नेत्याची पोकळी कशी भरुन निघणार ?

Update: 2026-01-29 07:22 GMT

Maratha Leadership in Maharashtra Politics  पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठा समाजाचा सुरुवातीपासूनच प्रभाव राहिलेला आहे. अलिकडच्या काळात मराठा समाजातील ज्या नेत्याचा सर्वात जास्त प्रभाव दिसला होता तो नेता म्हणजे अजित पवार. महाराष्ट्रात मराठा समाज हा लोकसंख्येनं जास्त असला तरी त्या समाजासह इतर समाजालाही मान्य असं नेतृत्व करण्याची क्षमता मोजक्याच नेत्यांमध्ये होती. त्याच नेत्यांमध्ये Ajit Pawar अजित पवारांचाही समावेश होतो. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील दमदार, सक्षम अशा मराठा नेत्याची पोकळी निर्माण झालीय.

महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे २८ टक्के मराठा समाज आहे. त्यामुळं साहजिकच मराठा समाजाचा महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव राहिलेला आहे. त्यातही काँग्रेसमधील मराठा नेत्यांचा प्रभाव हा इतर पक्षाच्या तुलनेनं अधिक होता. यशवंतराव चव्हाण, पी.के.सावंत, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, नारायण राणे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि एकनाथ शिंदे या मराठा समाजाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भुषविलेलं आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नारायण राणे, विलासराव देशमुख आणि एकनाथ शिंदे यांनी आपापल्या प्रभाव क्षेत्राबाहेरच्या लोकांमध्येही लोकप्रियता मिळवली. Yashwantrao Chavan, P.K. Sawant, Shankarrao Chavan, Vasantdada Patil, Sharad Pawar, Babasaheb Bhosale, Shivajirao Patil-Nilangekar, Narayan Rane, Vilasrao Deshmukh, Ashok Chavan, Prithviraj Chavan and Eknath Shinde  

१९९१ मध्ये अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येत थेट राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. मात्र, काही कालावधीतच ते पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात परतले आणि इथेच रमले देखील. १९९९ मध्ये जेव्हा काँग्रेसपासून विभक्त होत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर खऱ्या अर्थानं अजित पवारांचं नेतृत्व सर्वमान्य व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा नेत्यांचा प्रभाव असलेला पक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. जयंत पाटील, आर.आर.पाटील, डॉ. पद्मसिंह पाटील, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख या नेत्यांचा त्याकाळच्या राजकारणात दबदबा होता. यापैकी आर.आर.पाटील यांचं अकाली निधन झालं. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर डॉ. पद्मसिंह पाटील हे सक्रिय राजकारणात नाहीत.

अजित पवारांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता मिळत असतांनाच त्यांचं अकाली निधन झालं. त्यामुळं आता महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा नेतृत्वाची दमदार, ताकदवर अशी मोठी पोकळी निर्माण झाल्याचं चित्र आहे.

यासंदर्भात ज्येष्ठ राजकीय पत्रकार राही भिडे सांगतात की,

मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते आता नेते झाले आहेत. तसेच मराठा समाजातील नेत्यांसोबत इतर जाती-धर्माचे लोक सुद्धा त्यांना जोडले गेले आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांनाही अजित पवार यांनी जवळ केलं होतं. सध्याच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ मराठ्यांचा पक्ष असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आता जरी मराठा नेतृत्व असलं तरी त्यांच्या जवळच्या लोकांचेही नेतृत्व अजित पवारांनी तयार केलं आहे. या पुढे मराठा नेता म्हणून कोण पुढं येणार यावर पक्षातील सर्व जण एकत्रितरित्या बसून निर्णय घेतील. परंतु यामध्ये मराठाचा नेता हवा असा आग्रहसुद्धा असू शकतो. कारण मराठ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानं एक गट सत्तेविना राहिलेला आहे. जर पक्षात मराठ्यांसोबत अमराठीही एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये ही एक मोठी ताकद म्हणून उभी राहू शकते. असं राही भिडे यांनी सांगितलं आहे. 

दरम्यान, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख या दिवंगत नेत्यांची ओळख ही त्याकाळातही मराठा समाजाचे प्रभावी नेते अशी होती. त्यानंतर सध्या नारायण राणे, एकनाथ शिंदे या दोनच नेत्यांचा थोडाफार प्रभाव मराठा नेते म्हणून दिसतो. त्यातही नारायण राणे यांचा प्रभाव हा कोकणात अधिक दिसतो. तर एकनाथ शिंदेंचा प्रभाव हा मुंबई महानगर प्रदेशच्या भोवताली अधिक आहे. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रभर प्रभाव टाकू शकेल, असा मराठा समाजाचा एकही नेता आज महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तरी दिसत नाहीये. अजित पवार हे सध्याच्या राजकारणातलं मराठा समाजाचं सर्वमान्य असं नेतृत्व होतं. महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत तत्कालीन मराठा नेत्यांनी आपापल्या पद्धतीनं नेतृत्व केलं होतं. या वाटचालीत अजित पवारही होते. त्यांच्या अकाली निधनानंतर सर्वमान्य मराठा नेतृत्वाची राजकारणातील पोकळी कशी भरुन निघणार, या प्रश्नाचं उत्तर येणारा काळचं देईल...

Tags:    

Similar News