भाजपाचे 'टूलकीट' देशासाठी सगळ्यात घातक व विषारी: सचिन सावंत

भारतीय जनता पक्षाने सेलिब्रिटींवर दबाव आणून शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट करण्यास भाग पाडले हा काँग्रेसचा आरोप सत्य होता हे सिद्ध झाले असून पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत भाजपाच्या आयटी सेल व १२ व्यक्तींचा हात होता हे समोर आले आहे. या भाजपाने देशविरोधी केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला असून भाजपा आयटी सेल व १२ जणांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

Update: 2021-02-16 10:25 GMT

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, काँग्रेसने आपल्या देशाच्या राष्ट्रीय हिरोंवरती दबाव आणून भाजपाने त्यांना ट्विट करण्यास भाग पाडले असा आरोप करून भाजपाच्या चौकशीची मागणी करून अनेक दिवस उलट्यानंतरही या देशाच्या राष्ट्रीय हिरोंपैकी एकाही व्यक्तीने पुढे येऊन सदर ट्विटद्वारे मांडलेले मत हे त्याचे स्वतःचे होते असे सांगितले नाही. देशपातळीवर एवढे मोठे वादळ उठून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावेडकर व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपातर्फे केलेले षडयंत्र लपवण्याचा प्रयत्न केला तरीही या सेलिब्रिटींनी साधलेली चुप्पी ही भाजपाच्या  षडयंत्राबद्दल प्रचंड काही सांगून जाते. सदर प्रकरण पुढे  येऊ नये आणि भाजपाचा कुटील चेहरा लपला जावा याकरता भाजपाचे नेते देशासाठी आदरणीय अशा भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडूलकर यांच्या मागे लपून महाराष्ट्र सरकार या भारतरत्नांची चौकशी करणार असा खोटा कांगावा करत होता. परंतु आता सत्य समोर आले असून या पुढच्या चौकशीमधून भाजपाचा देशविरोधी कट समोर आल्याशिवाय राहणार नाही असे सावंत म्हणाले.


देशाकरता सर्वाधिक घातक व विषारी टूलकिट हे भाजपाचे असून या टुलकिटमधून भारतीय लोकशाही नष्ट करण्याचे काम भाजपा करत आहे. मोदी सरकारची ५६ इंच छाती किती पोकळ आहे हे पर्यावरणवादी दिशा रवी या युवतीला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करून सिद्ध केलेले आहे. दिशा रवीबरोबर महाराष्ट्रातीलही काही जणांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यामागे युवापिढी व मध्यमवर्गाचा आवाज दाबला जावा व गरिब शेतकऱ्यांबरोबर तो आवाज सामील होऊ नये हा त्यांचा उद्देश आहे. देशातील विचारवंतांचा आवाज अशाच प्रकारे मोदी सरकारने दाबला आहे.

परंतु हेच मोदी सरकार बालाकोटसारख्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर अर्णब गोस्वामीकडे अगोदरच माहिती कशी आली याची साधी विचारणाही करत नाही. ऑफिशियल सिक्रेट ऍक्टच्या कलम ५ चे उल्लंघन झालेले असतानाही त्याच्यावर खटला का दाखल होत नाही हा प्रश्न निश्चितपणे देशाच्या जनतेसमोर आहे.दिल्ली दंगलीतील कपील मिश्रा, मंत्री अनुराग ठाकूर किंवा खा. परवेश वर्मा यांना मात्र खुली सुट दिली जात आहे आणि अदखलपात्र अशा घटनांना देशद्रोहाचे रुप दिले जात आहे ही लोकशाहीची विटंबना आहे. अभिनेते व भाजपाचे माजी खा. परेश रावल यांनी टूलकिटसंदर्भात केलेल्या ट्विटबद्दल भाजपाचे मत काय हेही समोर आले पाहिजे. अर्णब गोस्वामीविरोधातील कारवाई संदर्भात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने पुढाकार घ्यावा या मागणीचा पुनरुच्चारही सावंत यांनी केला.

Tags:    

Similar News