दुबार पेरणीचे संकट, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी खासदार रक्षा खडसेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Update: 2021-07-04 13:07 GMT

सुरूवातीला पावसाला चांगली सुरूवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्साहाने पेरणी केली. पण आता पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे कुठेही पाऊस झालेला नाही. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता जुलै महिना उजाडला तरीसुद्धा अजून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पावसा अभावी नाईलाजास्तव शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. तरी शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध द्या तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करावे, असे पत्र भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना पाठवले आहे.




आधीच गेल्या दोन वर्षांच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. २०१५ मध्ये राज्य सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग केला होतो. तो बऱ्याच ठिकाणी यशस्वीसुद्धा झाला होता. त्याचप्रमाणे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावे अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

Tags:    

Similar News