बोगस बियाण्यांचा फटका, हिरवे स्वप्न करपले !

Update: 2020-07-08 03:58 GMT

कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेला बळीराजा नव्याने हिरवे स्वप्न पाहत यंदा पेरणी केली. पण सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे या शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले आहे. दुबार पेरणी केली असली तरी हंगामाचा महत्त्वाचा काळ वाया गेल्यानं दुबार पेरणीतून किती उत्पन्न येईल या चिंतेत आता बळीराजा आहे.

बुलडाणा जिल्ह्यात एकूण 2 लाख 63 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. त्यातच पावसाने दडी मारल्याने आणि सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाल्याने पेरलेले उगवलेच नाही. शेतकऱ्यांचे 800 हेक्टर क्षेत्रावर पेरलेले हिरवे स्वप्न करपले आहे. जिह्यात निकृष्ट बियाण्यांच्या एकूण 688 तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. त्यापैकी 510 शेतकऱ्यांच्या शेतांची अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थिती

  • जिह्यात 7 लाख 48 हजार हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य
  • 4 लाख 38 हजार 500 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी तयार
  • प्रत्यक्षात 3 लाख 70 हजार क्षेत्रावर 70 टक्के पेरणी
  • 2 लाख 63 हजार क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पीक घरात ठेवावे लागले. त्यामुळे मालाला योग्य भाव मिळाला नाही. यातून बाहेर पडण्यासाठी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी जोर लावून सोयाबीनची पेरणी केली, पण आता पेरलेले बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे दुबार पेरणी करावी कशी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.

हे ही वाचा..

कृषी यंत्रणा कामाला लागली असली तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्हायचे आहेत. शेतकऱ्यांची कधी बोगस बियाणांच्या विक्रीतून लूट होत आहे तर कधी सावकाराकडून शेतकऱ्यांचा छळ होतो आहे. काही ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांची अरेरावी तर बहुतांश ठिकाणी महावितरणचे शॉक अशा चारही बाजुंनी शेतकरी संकटात आहे. पूर्ण संकटाच्या काळात शेतकरी आधीच त्रस्त असताना आता बोगस बियाणांमुळे त्याच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. लागवडीचा खर्च आणि मोफत बियाणे मिळावे यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

Similar News