आर्कीड फुलाच्या शेतीतून शेतकऱ्याची आर्थिक उन्नती

विदर्भात प्रथमच आर्कीडच्या फुलाची शेती करण्यात शेतकऱ्य़ांना यश मिळालं आहे. या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. थायलंड येथून आर्कीडचे रोपटे आणून सॉईल लेस शेती विदर्भात सुरु केल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

Update: 2023-03-08 08:16 GMT

 यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र विदर्भात प्रथमच दारव्हा तालुक्यातील जवळा येथील प्रगतीशील शेतकर्‍याने ऑर्कीड फुल (Orchid Flower) शेतीतून आर्थिक उन्नती केली आहे. विशेष म्हणजे थायलंड येथून रोपटे आणून नारळाच्या सेलमध्ये सॉईल लेस (Soilless Farming) त्याची लागवड केली. त्या ऑर्कीड रोपट्याला आता फुले आली असून, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. पहिल्याच वर्षी ८ ते ९ लाख रुपये उत्पन्न होण्याची आशा शेतकर्‍याने व्यक्त केली आहे.

जवाहर राठोड, असे या प्रगतीशील शेतकर्‍याचे नाव असून, ते दारव्हा तालुक्यातील जवळा येथील रहिवासी आहे. त्यांच्याकडे असलेल्या एक एकर शेतीत त्यांनी ऑर्कीड फुल शेती करण्याचे ठरविले. परंतु, यवतमाळ जिल्ह्यात उष्ण तापमान असल्याने शेती फुलणार नाही, असे अभ्यासकांनी सांगितले होते. सुरुवातीला निराशा आली. तरी राठोड दाम्पत्याने तीन दिवसाचे प्रशिक्षण घेतले. काही झाले तरी चालेल, एक पाऊल पुढे टाकायचे असे ठरवून ऑर्कीड फुलशेती (Orchid Flower) करण्याचा निश्‍चय या दाम्पत्यांनी केला.

शेतात पॉलीहाऊस बांधून पुणे येथील कंपनीच्या माध्यमातून थायलंड येथून ऑर्कीडचे रोपटे मागवले. हे रोपटे मातीत लागत नाही. त्याची लागवड कोकोसेलमध्ये करावी लागते. कोकोसेल आणि पाणी यावरच ऑर्कीडचे रोपटे जगते. आता सहा महिन्यात ऑर्कीड फुलशेती (Orchid Flower) बहरली असून, पहिल्याच वर्षी ८ ते ९ लाख रुपये उत्पन्न येण्याची अपेक्षा शेतकर्‍याला आहे. पुढील वर्षी २० लाखाच्या घरात उत्पन्न येण्याचा आशावाद शेतकर्‍याने व्यक्त केला आहे. या फुलशेतीमुळे परिसरातील ८ ते ९ जणांना रोजगार सुद्धा मिळाला आहे. या फुलाला दिल्ली मुंबई, हैदराबाद, नागपूर येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शेतकर्‍यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञान आत्मसाद केल्यास इतरही शेतकरी आर्थिक उन्नती करू शकतात, असे या शेतकऱ्याने सांगितले आहे.

शेतकर्‍यांनी आपल्या शेतीमध्ये नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास राज्यात शेतकरी आत्महत्या होणार नाहीत. एका एकरात ऑर्कीड फुलशेती(Orchid Flower) केली तर बाजारात एका फुलाला २० ते २५ रुपये भाव मिळतो. यवतमाळ जिल्ह्यातील वातावरण फुलशेतीसाठी पोषक नसल्याचे सांगण्यात आले. तरी ऑर्कीड फुलशेती करण्यासाठी पतीला प्रोत्साहन दिले आणि कामगारांना रोजगारही मिळाला. देशविदेशात या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे महिला शेतकऱ्यांनी सांगितले.

विदर्भातील असा हा नाविन्यपूर्ण पहिलाच उपक्रम आहे. कोणत्याही प्रकारची माती न वापरता कोकोसेलमध्ये या रोपांची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्याने कर्नाटक आणि इतर राज्यात जाऊन प्रशिक्षण घेतले तर अशा प्रकारची शेतीला पूरक असा व्यवसाय सुद्धा करता येवू शकतो, हे या शेतकऱ्याने पॉलिहाऊसमध्ये फुलवलेल्या शेतीतून दिसून येत आहे. नानाजी देशमुख प्रकल्पात (Nanaji Deshmukh Project)याचा समावेश आहे. या ऑर्कीड फुलशेतीसाठी ४५ लाख रुपयांचा खर्च झाला असून, त्याला अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसाठी प्रेरक असा हा उपक्रम आहे.

Tags:    

Similar News