हिंदू जन आक्रोश कशासाठी?

भारतात सर्वाधिक लोकसंख्या हिंदू धर्मियांची आहे . सर्व सत्ता स्थाने, नोकरशाही , पोलीस दल ,सैन्यदल यात 90% पेक्षा जास्त संख्या हिंदूंची आहे. तरी या देशातील हिंदूचा जन आक्रोश कशासाठी? हा प्रश्न भारतात नव्हे, तर जगातील ज्या देशात ही बातमी पोहचते. त्या देशातील जनतेला सुद्धा पडला असेल. त्यामुळे या जन आक्रोश मोर्चामागे काय आहे राजकीय मानसिकता? काय आहेत राजकीय समीकरणं जाणून घेण्यासाठी डॉ. बाळासाहेब पवार यांचा परखड विश्लेषण करणारा हा लेख नक्की वाचा...

Update: 2023-02-01 02:56 GMT

आता जगात कुठं काहीही घडो ते देशापुरते मर्यादित राहत नाही . सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियातून ते जगभर पोहचले जाते. भारतात गेली आठ वर्ष नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे व जगातील सर्व हिंदूंची संघटना असा दावा करणारी, आंतरराष्ट्रीय संघटन असणारी राष्ट्रीय सेवक संघ ही नरेंद्र मोदी व अमित शहा सरकारची मातृसंस्था आहे. जागतिक पातळीवर गुजरातमधील गोध्रा नरसंहारानंतर त्यांची प्रतिमा हिंदूंचे नेतृत्व म्हणूनच पुढे आली. तसेच हिंदू ही एक शक्ती आहे असा संदेश जगाला मिळाला आहे. तरीही भरतातील हिंदू आक्रोशीत का आहे? तो रस्त्यावर उतरून जन आक्रोश मोर्चे काढून आपला आक्रोश जगापुढे का मांडतो आहे? ही बाब जागतिक पातळीवर धक्कादायक तेवढीच मोदी व शहा सरकारची प्रतिमा जागतिक पातळीवर खराब करणारी आहे . 'हिंदू' या मुद्यावर व देवळांच्या राजकारणावर सत्तेत आलेले सरकार त्याच हिंदूचे रक्षण करू शकत नाही. हिंदू आक्रोशीत आहे व तो रस्त्यावर उतरतो आहे, हे सरकारचे मोठे अपयश आहे, असाच त्याचा अर्थ निघतो.

भारतातील हिंदू जो आक्रोशीत का आहे? हिंदू देशात परकोटीला पोहचलेल्या बेरोजगारी मुळे आक्रोशीत झाला आहे का ?तो देशात प्रचंड महागाई झाली आहे म्हणून आक्रोशीत आहे का ? तो देशातील सरकार विरुद्ध आक्रोशीत आहे का? या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. मग जन आक्रोश कशासाठी आहे? हा संभ्रम कायम राहतो.

भारतात हिंदूवर मुस्लिम , बौद्ध, ख्रिश्चन ,आदिवासी अन्याय अत्याचार तर करत नाहीत ना? असाही समज होऊ शकतो. पण हिंदुत्ववादू सरकार असताना हे असे कसे घडते की, हिंदूंना हिंदूंचे सरकार असताना जन आक्रोश मोर्चे काढावे लागत आहेत . हिंदू आपल्या हिंदुत्ववादी हिंदुरक्षक सरकारकडून मागण्या मान्य करून घेऊ शकत नाही का ? मोदी व शहा सरकार हिंदूंचे ऐकत नाही किंवा त्यांचे संरक्षण करू शकत नाही, असा संदेश जगाला जात आहे. याची जाणीव या सरकार ला आहे का? हा खरा प्रश्न आहे.

राजकारणासाठी आपण काय करतो हा विवेक व विचार शिल्लक राहिला नसेल तर अशा घटना घडत राहतात. अशाच घटना मुस्लिम देशात घडल्या आहेत. मुस्लिम देश धर्माच्या कायद्यानुसार चालणारे व मुस्लिम राज्यकर्ते असताना असाच जनाक्रोश तयार होत गेला . मोर्चात झेंडे घेतलेल्या पंचवीशीच्या आतील वयाच्या मुलांच्या हातातील झेंडा काढून त्याच्या हातात शस्त्र सोपवले गेले. पण ते देश आपसात यादवी होऊन बेचिराख झाले. तिथे तर त्यांचा एकमेव धर्म होता दुसरा धर्म त्या देशात नव्हता. तरी महासत्तांनी ते घडून आणले. ही नोंद घेण्यासारखी बाब आहे .

जनाक्रोश राजकीय असला तरी तो आपला हिंदूचा अपमान करणारा आहे. आम्ही आमच्या देशात आक्रोशीत आहोत व तो मुद्दा अत्यंत वैयक्तिक व कौटूंबिक आहे. अतिशय तुरळक घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. त्यात आम्ही हिंदू आणखी एक बाब विसरून आक्रोश करत आहोत. ती बाब म्हणजे आमचे संस्कार. ते कमी पडत आहेत म्हणून आम्ही कायदा करा म्हणत आहोत का? आमच्या मुलींनी आंतर धर्मीय विवाह करावेत का? जर ते केल्यास तिची फसवणूक व शोषण अत्याचार होतो म्हणजे सध्या देशातील कायदा कमी पडतो आहे का? मग आमचे सरकार असताना सरकार योग्य काळजी का घेत नाही. त्यासाठी जन आक्रोश का करावा लागतो?

त्यामुळे हिंदू जनआक्रोश हा प्रश्न समाजिक आहे की राजकीय? याचा अगोदर विचार करावा लागेल. लग्न ही कौटूंबिक व व्यक्तिगत बाब आहे. विवाह संस्था ही समाजिक संस्था आहे. आंतर धर्मीय विवाहाचा विचार समाजिक मंचावर व्हावा, ना की तो राजकीय मुद्दा बनावा. फक्त हिंदू मुलीच दुसऱ्या धर्माच्या मुलाशी लग्न करतात का? मुस्लिम मुली हिंदुशी लग्न करत नाहीत का? असे अनेक प्रश्न आहेत. त्यातच मुस्लिम मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करण्याचे हे प्रमाणही खूप मोठे आहे. मग मुस्लिमांनी पण असंच जन आक्रोश मोर्चे काढावेत का? आपल्याच हिंदू मुला-मुलींचे विवाह होतात. तेव्हा त्यांचा छळ होत नाही असे नाही. कुटूंब न्यायालयात सर्वाधिक खटले हिंदूंचेच आहेत. जे अनेक पिढ्यांचे नातेवाईक सुद्धा आहेत.

या प्रश्नाचा दुसरा भयंकर परिणाम म्हणजे आपल्याच मुलीबद्दल हिंदू कुटूंबात निर्माण होणारी असुरक्षितता. यामुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. तिचे व्यक्ती स्वातंत्र्य संकुचित होऊन तिला सतत संशयाखाली ठेवलं जात आहे. आपल्याच मुलीबद्दल असलेले प्रेम आता संशययात बदलत आहे. मुलीबद्दल पालकांना सतत चिंतेत ठेवणारे वातावरण निर्माण होत आहे. मग मुलगी कोणत्याही धर्माची असो...

त्यामुळे हा मुद्दा रस्त्यावर न आणता आपण आपल्या कुटूंबातील सु-संवाद वाढवून आपल्या लेकरांवर योग्य संस्कार करून थोपवू शकतो. या व्यक्तिगत पातळीवरील व्यवहाराला कोणता संपूर्ण धर्म जबाबदार धरून गलिच्छ राजकारण करणे आपल्या देशाला परवडणारे नाही. मुस्लिम मुली हिंदू मुलाशी लग्न करतात, तेव्हा आपण हिंदू म्हणून दोषी ठरतो असा अर्थ घेण्यात अर्थ नाही.

अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया मुस्लिम धर्मात उमटत आहेत. तिथेही हिच असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. देशात आधीच मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. यातून मुलींना बुरखा किंवा हिजाब घालणे आता बंधनकारक होत आहे. मुस्लिम धर्मीय फारच धर्म निरपेक्ष व विशाल दृष्टी कोण असणारे आहेत, असा अजिबात भाग नाही. कट्ट्ररवादी लोक सर्वच धर्मात असतात. मुस्लिम मुलींना विशिष्ट्य शाळेतील विशिष्ट माध्यमात व ठराविक इयत्तेपर्यंत शिक्षण देण्याचे प्रमाण वाढत आहे. मुळातच मुस्लिम मुलींचे शिक्षणात प्रमाण कमी आहे. त्यात या असुरक्षिततेमुळे ते प्रमाण आणखी कमी होऊ लागले आहे. हिंदू मुली म्हणजे आपलीच प्रॉपर्टी समजून काही संघटना जशा ठेकेदार बनल्या आहेत तोच प्रकार मुस्लिम धर्मातही पहायला मिळत आहे. त्यामुळे हिंदू जास्त असलेल्या शाळेत न शिकवणे, हिंदू मुलांशी बोलू न देणे, असे काही प्रकार झाल्यास हल्ला करणे हे प्रकारही वाढत आहेत.

या सगळ्या प्रकारात बळी जातो तो स्त्रीचा. तिच्या जगण्याचा संकोच होतो . ती हजारो वर्ष धार्मिक, पारंपरिक अत्याचाराची बळी ठरली आहे . ती आता पुन्हा राजकारणापायी बळी ठरत आहे.

यात आणखी एक अंतर्मुख करणारा प्रश्न आहे तो म्हणजे, या देशातील प्रत्येक हिंदूशी आम्ही प्रेम, सहकार्य व समानतेच्या भावनेने वागतो का? हिंदू आहे म्हणून पवित्र भावनेने काहीही लाभ न घेता वागतो का? जर आपण असे करत असू तरच आपल्याला हिंदूंसाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. एवढंच नाही तर गरीबी, बेरोजगारी, महागाई या प्रश्नांनी सर्वात जास्त भाजला गेला आहे तो हिंदू. त्यामुळे हिंदूंनी या प्रश्नांवर आक्रोश करायला हवा. अन्यथा धार्मिक मुद्द्यावर आक्रोश करत बसलो तर राजकारणाच्या बळी ठरणाऱ्या याच स्त्रियांचा आक्रोश घराघरात ऐकायला मिळेल. तेव्हा धर्मसत्तेला तडे गेल्याशिवाय राहणार नाहीत.

Tags:    

Similar News