Digital Transformation : क्षमतेपेक्षा आता चपळता महत्वाची ठरणार!

कोणते शिक्षण घ्यावे किंवा पदवी मिळवावी जेणेकरून या कमालीच्या वेगवान आणि त्याच वेळी मूलभूत बदलांना आपण सामोरे जाऊ शकू? वेगाने बदलणारे जग आणि तंत्रज्ञानाविषयी लेखक गौरव सोमवंशी यांनी मॅक्स महाराष्ट्रच्या चिंतन विशेषांकामघ्ये लिहिलेला लेख पुन:प्रकाशित करत आहोत.

Update: 2025-12-11 04:32 GMT

Marshall McLuhan मार्शल मॅकलुहान या कॅनेडियन तत्त्वज्ञानाचं एक खूप महत्वाचं वाक्य आहे की, 'अगोदर आपण आपली साधने घडवितो, आणि नंतर मग हीच साधने आपल्याला घडवीत राहतात'. हे 'घडविणे' प्रकार सकारात्मक असेल किंवा नकारात्मक हे नंतर येतं, पण आपण घडविलेल्या गोष्टींतूनच पुढे आपण घडत राहतो हे मात्र नक्की. आणि इतर प्राणिमात्रांपासून आपण जर का कोणत्या अर्थाने वेगळे असू तर त्यामधील सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे मानवजातीने घडविलेले तंत्रज्ञान. मग ते आगीच्या किंवा चाकाच्या शोधापासून ते थेट AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत सगळंच त्यामध्ये आलं. 

एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आणि काही प्रमाणात आपण किती आणि कोणत्या दिशेने Technology तंत्रज्ञान घडवितो ते आपल्या हातात असतं. पण सध्या अनेक अर्थानी हा टप्पा कधीच मागे पडला आहे, आणि दिवसानुदिवस आपणच किती आपल्याच बनविल्या गेल्या तंत्रज्ञानामुळे बदलत आहोत याचा आढावा घेण्याची वेळ आली आहे.      

खासकरून पुढे तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या कामातील, व्यवसायातील बदल, आणि यांच्याशी निगडित शिक्षण, कौशल्य यांचे बदलते समीकरण समजून घेणे आता गरजेचे. 

Future of Jobs Survey 'फ्युचर ऑफ जॉब्स सर्व्हे' म्हणजेच 'नोकऱ्यांचे पुढील भवितव्य सर्वेक्षण' हे जागतिक पातळीवर होणारे त्या विषयातील सर्वात व्यापक सर्वेक्षण म्हणता येईल जे जर ४ वर्षांनी केले जाते. याच सर्वेक्षणाच्या २०२३ च्या अहवालात त्यांनी पुढील चार वर्षांचे भाकीत मांडले आहे. हे करत असताना सर्वेक्षणात जागांमधून ८०३ कंपन्यांचा समावेश झाला असून, जवळपास ११.३ कोटी कामगार आणि नोकरदारांचा आढावा घेतला आहे. हे करण्यामागे मुख्य हेतू होता की काही 'मेगाट्रेंड' ओळखून घेणे. यामध्ये जवळपास ८५% कंपन्यांनी पुढील काही वर्षात cloud computing, big data क्लाऊड कम्प्युटिंग, बिग डेटा, artificial intelligenceआर्टिफिशियल इंटेलिजन्स अशे काही उदयोन्मुख तंत्रज्ञान आपल्या संस्थेच्या कार्यप्रणालीत समाकलित करून घेण्याचे हेतू मांडले. या 'मेगाट्रेंड' मुळेच काही प्रकारच्या नोकऱ्यांचे लोप पावणे अटळ आहे, जसे की कारकुनी काम. पण त्याच वेळी तंत्रज्ञानाशी निगडित नोकऱ्यांना भरपूर वाव मिळणार आहे हे देखील नमूद झाले. digitalization 'डिजिटलायझेशन' सोबत दुसरा मेगाट्रेंड हा 'सस्टेनेबिलिटी' या उद्देश्यावर असणार आहे हे देखील आढळून आले, आणि या संबंधी अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय धोरण देखील सक्रिय झाले असून याच्याशी निगडित एक विशिष्ट अनुभवी लोकांची फळी देखील उभी राहत आहे. 

या सगळ्या मेगाट्रेंड्समध्ये megatrends आपण कुठे बसतो आणि यातून मार्ग कसा काढायचा?

Melvin Kranzberg  मेल्वीन क्रॅन्झबर्ग, या अमेरिकन इतिहासकाराने तंत्रज्ञानाचे ६ नियम जगासमोर मांडले होते, जे की कोणत्याही तंत्रज्ञानाला लागू होतात. यातील पहिला नियम म्हणजे 'तंत्रज्ञान हे स्वतःहून चांगले किंवा वाईट नसते; पण त्याच वेळी ते तटस्थ देखील नसते.' म्हणजेच की तंत्रज्ञान हे अनेक वेळा पक्षपाती असते. हे या अर्थाने की तंत्रज्ञानाचा फायदा हा अनेक वेळा प्रस्थापित वर्गाला जास्त होतो कारण त्यावर नियंत्रण या वर्गाचा इतरांपेक्षा अधिक. उदाहरण म्हणून 'फ्युचर ऑफ जॉब्स सर्व्हे' मधेच आढळून आले की २०२७ अगोदर ६०% कामगारांच्या लोकसंख्येला नवीन तंत्रज्ञानात पारंगत होण्याची आवश्यकता भासणार आहे, पण नवीन तंत्रज्ञानात पारंगत होण्यासाठी लागणारी संधीच फक्त ५०% लोकांकडे उपलब्ध असणार आहे. वरून जिथे जवळपास प्रत्येक व्यवसाय हा झपाट्याने डिजिटल होण्याकडे वळत आहे त्याच वेळी प्रत्येक क्षणाला एक 'दरी' अधिक रुंद होत चालली आहे ज्याला आपण 'डिजिटल डिव्हाईड' असे म्हणतो. अर्थशास्त्रात जसं 'मॅथ्यू सिद्धांत' असं मांडतो की पैसा हा तिथेच जास्त जातो जिथे अगोदरच पैसे आहे, अगदी तसेच काही तंत्रज्ञानाचे देखील होईल हे आपण पाहतच आहोत. 

म्हणून सध्याच झपाट्यानं वाढणारं तंत्रज्ञान हे आपल्या आजच्या सामाजिक व आर्थिक व्यवस्थेवर आधारित वास्तवासाठी आणि समाजरचनेसाठी किती प्रमाणावर परिणामकारक ठरेल हा एक प्रश्न आहेच जो की व्यापक पद्धतीने सामोरे गेलाच पाहिजे. पण या लेखाचा हेतू हे वैयक्तिक दृष्टिकोनातून या बदलाकडे पाहणं हे असल्यामुळे त्यावर अजून सखोल जाऊया. Google गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सुंदर पिचाई हे नुकतेच म्हणाले होते की, 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' हे मानव जातीने अभ्यास केलेल्या सर्व विषयांपेक्षा महत्वाचे आहे, अगदी वीज आणि आगीपेक्षाही. आणि हा दृष्टिकोन खरं असेल असं वाटण्यासाठी काही गोष्टी घडल्या देखील. ChatGPT 'चॅट-जीपीटी' च्या निमित्ताने 'जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स' चे आगमन जवळपास एका वर्षा अगोदर झाले आणि काही आठवड्यातच करोडो लोकं याचा वापर करू लागली. 'चॅट-जीपीटी' आणि अश्या इतर शोधांनी हे दाखवून दिले की अशी बरीच कामं, जी आजपर्यंत फक्त आपल्याला शक्य होती आणि ज्यामध्ये संगणक आणि इंटरनेटचा वापर फार तर संशोधनापर्यंत मर्यादित असून बऱ्याच प्रमाणात आपल्या कौशल्यावर आणि अनुभवावर अवलंबून होता, अश्या अनेक कामांमध्ये आता हे नवीन तांत्रिक साधनेच स्वतःहून जवळपास सर्व काम करू शकतील. यामध्ये अगदी एखादी कविता लिहिण्यापासून ते एखाद्या प्रोग्रॅमचा कोड लिहिण्यापासून ते अगदी एखाद्या कायदेशीर कराराचा मसुदा बनविण्यापर्यंत हे सर्वच काम आले. आणि ही फक्त एक सुरुवातच म्हणावी लागेल. बिग डेटा, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित अनेक प्रयोग, क्लाऊड कम्प्युटिंग, अश्या इतर तंत्रज्ञानाची सुद्धा सुरुवातच झालेली असून याचे प्रभाव वाढतच राहणार आहेत.  

मग अश्या वेळेस असे कोणते शिक्षण घ्यावे किंवा पदवी मिळवावी जेणेकरून या कमालीच्या वेगवान आणि त्याच वेळी मूलभूत बदलांना आपण सामोरे जाऊ शकू? जर माझे स्वतःचे संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान हे कार्यक्षेत्र पाहिले तर अनेक मोठे बदल मागील १५ वर्षातच बघायला मिळाले. अगोदर या क्षेत्रात नोकऱ्यांसाठी याच विषयातील पदवीधर शिक्षण गरजेचे होते. नंतर काही वर्षात असं झालं की इतर कोणतेही अभियांत्रिकी विषयांमध्ये पदवी मिळवली असेल तर ती देखील नोकरी मिळवण्यासाठी पुरेशी आहे. आणि सध्या अशी परिस्थिती आहे की त्याचीही गरज नाही. फक्त ऑनलाईन पद्धतीने कोणी स्वतःला शिकवले असेल आणि घरीबसुन काही प्रकल्पांवर काम केले असेल, तर यावरून मिळणारा अनुभव आणि कौशल्य हेच फक्त बऱ्याच नोकऱ्यांमध्ये बघितले जातात. शिक्षण कुठून केले आणि कोणती पदवी मिळवली या गोष्टीला किमान या क्षेत्रामध्ये आता आधी सारखे महत्व उरलेले नाही. म्हणजे काय? तर, हे कार्यक्षेत्रच असं आहे की तुम्ही प्रवेश घेतल्यापासून ते पास होण्यापर्यंत तुम्ही शिकलेले तंत्रज्ञान हे बऱ्याच ठिकाणांहून लुप्त झालेले असेल, तर तुम्ही नक्की काय शिकता यापेक्षा 'कसे’' शिकता यावर भर वाढत चालला आहे.

'फ्युचर ऑफ जॉब्स सर्व्हे' यानुसार 'प्रॉब्लेम सॉलविंग' म्हणजे कोणतीही उद्भवलेली समस्या सोडविण्याचे कौशल्य आणि त्यासाठी लागणारे  solving skills, analytical thinking 'अनॅलिटीकल थिंकिंग', आणि creative thinking 'क्रिएटिव्ह थिंकिंग' म्हणजे सर्जनशीलता या गुणांना आता या कार्यक्षेत्रात इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्व आहे. जगप्रसिद्ध लेखक, आणि या विषयावरचे मानले जाणारे तज्ञ Adam Grantएडम ग्रँट म्हणतात की, 'तुमच्या कारकिर्दीत सर्वात महत्वाचे चलन हे आता 'तुम्हाला किती माहीत आहे' हे नसून, 'तुम्ही किती चांगल्या पद्धतीने नवीन गोष्ट शिकता' हे आहे. एका स्थिर जगामध्ये यश मिळवायचे असेल तर विशिष्ट विषयात स्वतःचे ज्ञान आणि अनुभव वाढविणे गरजेचे. पण एक निरंतर बदलणाऱ्या जगात यश हे पूर्णपणे तुम्ही किती लवकर स्वतःला नवीन विषयात विकसित कराल यावर अवलंबून असेल. 'एबिलिटी ऐवजी एजिलिटी' म्हणजे क्षमतेपेक्षा आता चपळता महत्वाची ठरणार आहे.' या सगळ्यामध्ये जर का आता 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' सारख्या गोष्टींची धास्ती भरली असेल, तर बी. एफ. स्कीनर या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक तत्वज्ञाचे शब्द आठवू, की, 'खरी समस्या ही नाही कि मशीन विचार करू शकते की नाही, तर खरा प्रश्न हा आहे कि माणूस विचार करेल की नाही.'                

उत्क्रांतीच्या दृष्टीकोनातून पाहिलं तर आपण मानव म्हणून लाखो वर्षांपासून या पृथ्वीवर वावरत आहोत, पण आपल्या जीवनशैलीत पहिला सर्वात मोठा बदल घडला जेव्हा शेती सुरु होऊन आपण एका ठिकाणी वसाहत' करून राहायला सुरुवात झाली. यानंतर होणार प्रत्येक मोठा बदल हा आपल्या जैविक संरचनेतून आलेला नसून, आपण विकसित केलेल्या तंत्रज्ञानावरून आला, ज्यामध्ये शेती, धातूंचा वापर, बांधकामात लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रिंटिंग मशीन, स्टीम इंजिन, विजेचा वापर, औषध-उपचारांवरील संशोधन ते अगदी संगणक, प्रसारमाध्यमं आणि इंटरनेटपर्यंत अश्या अनेक वेगवेगळ्या तंत्रज्ञानांनी आपले जीवन घडवले.

मागील तीन दशकांपासून जर पाहिलं तर बदलाचा वेग हा वाढतच राहतोय. अगोदर जे बदल बघायला शतकं लागायची आता तेच बदल दशकांत होत आहेत, अगोदर ज्या नवनवीन येणाऱ्या गोष्टींना आपल्या जीवनात रुजायला पिढ्यानपिढ्या लागायच्या त्या आता काही वर्षांतच आपल्या जीवनाचं अविभाज्य बनत आहे. म्हणून आता नुसतं बदल समजून चालणार नाही तर बदलाचा वेग सुद्धा प्रामुख्याने समजून त्यानुसार स्वतःला आणि समाजाला सक्षम बनणे गरजेचे झाले आहे. अश्या वेळी काही भाकीत करणं किंवा कोणती भविष्यवाणी देऊन काही विशिष्ट उपचार किंवा मार्ग सांगणं हे करणं चुकीचं ठरेल, शिवाय ते शक्य देखील नाही. मग काही पाऊल मागे घेऊन बदल कसा घडतो, याचे मूलगामी गुण कोणते, स्वतःला त्यासाठी कसं सक्षम बनवायचं, आणि येणाऱ्या कोणत्याही बदलला, मग तो कितीही मोठा असो, समजून घेऊन त्याला अनुसरून कसा मार्ग काढायचा जेणेकरून आपण स्वतःचे आणि इतरांना अर्थपूर्ण पद्धतीने आधार देऊ शकू, यावर विचार होणे गरजेचे. पण स्वतःला किंवा समाजाला तंत्रज्ञानाशी किंवा त्यामुळे होणाऱ्या कोणत्याही बदलाशी जुळवून घेताना असा कुठेही नियम नाही की हे फक्त 'वन-वे' ट्राफिक आहे. शेवटी काही प्रमाणात आपण स्वतः तंत्रज्ञाला, त्यावरून घडणाऱ्या गोष्टींना, आणि म्हणजेच भविष्याला दिशा देऊ शकतो हे भान असणे गरजेचे. जसं की नोबेल पारितोषिक मिळवलेले लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात. 'व्यावहारिक माणूस स्वत:ला जगाशी जुळवून घेतो; आणि अव्यावहारिक माणूस जगाला स्वत:च्या दृष्टिकोनाने जगच बदलण्याचा प्रयत्न करत राहतो. म्हणून सर्व प्रगती ही त्या अव्यावहारिक माणसावर अवलंबून आहे.' 


गौरव सोमवंशी

Similar News