लसोन्माद...

जनतेच्याच पैशातून दिलेली लस 'मोफत' कशी? मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत जनतेला वेठीला धरून नंतर लोकांना एकाच दिवशी ही लस द्यावी. हा पराक्रम आहे का? लस ही जीवनावश्यक गोष्ट आहे, मोदी यांनी देशाला वाटलेली खिरापत नव्हे... वाचा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचा लेख

Update: 2021-09-19 05:29 GMT

Photo courtesy : social media

दरवेळी आता उन्मादाचा विक्रम झाला असं आपल्याला वाटतं पण पुढचा उन्माद लगेच आपल्याला भानावर आणतो आणि हे सांगतो की, उन्मादाचं शिखर अजून वर आहे. अजून अजून वर आहे. कळसाला पोहोचल्याशिवाय उन्मादाचा नीट कडेलोट होत नसतो. कारण शंभराव्या अपराधापर्यंत वाट पहात बसण्याची आपली मानसिकता. कालचा लसोन्माद याच प्रकारातला. ज्या लशी उपलब्ध होत्या. त्या वाढदिवसाच्या मुहूर्तासाठी दाबून ठेवल्या होत्या. हे स्पष्ट आहे कारण एकाच दिवसात एवढं उत्पादन झालं असं तर ठार वेडा माणूसही म्हणणार नाही!

आत्ममग्नता आजार आहे, विक्रम नाही. मोदींची आत्ममग्नता जितकी घातक त्यापेक्षा घातक आहे. त्यांच्या उच्चशिक्षित पण नागरिक म्हणून निर्बुद्ध असलेल्या अनुयायांची मोदीमग्नता. यांनी मेंदू एवढा बाहेर काढून ठेवला आहे की, मोदींनी आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असलेली लस देणं हेही त्यांच्या वाढदिवसासाठी राखीव ठेवलं आहे हे कळण्याइतकीही अक्कल त्यांच्यात शिल्लक नाही. मोदी आपल्याला माणूस न समजता फक्त मतदार समजतात हे कळण्याइतकी तरी बुद्धी शाबूत ठेवायला हवी. मोदी आपल्याला माणूस समजले असते तर लस उपलब्ध झाली तशी पटापट दिली असती. 'त्यांचा वाढदिवस' ही पूर्व अट आपल्या आरोग्याला लावली नसती!

मोदीकाळाचा सगळ्यात मोठा तोटा असा की भारतात नागरिक तयार न होता फक्त मतदार तयार केला जात आहे. यातून लोकशाही कुठं पोहोचणार ते कळत नाही. संघ आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना विचार करायला कधीच शिकवलं जात नाही. याचा पुरेपूर फायदा मोदी घेतात. कारण तसं नसतं आणि ते विचार करणारे असते तर (गांधी वगैरे सोडा, ते तुमचे शत्रूच) पण 'हीच मोहीम परमपूज्य हेडगेवार, महापरमपूज्य गोळवलकर गुरूजी किंवा गेलाबाजार वाजपेयींच्या जयंती, पुण्यतिथीला राबवता आली नसती का'? असा एक किमान प्रश्न त्यांना नक्की पडला असता.

काल जे जे लस मोहीमेचं कौतुक करत होते ते ते कदाचित हे मान्य करत होते की, आम्हाला जगवतील तर मोदीच अन्यथा नागरिक म्हणून जगण्याची आमची धमक नाही. नागरिक म्हणून प्रश्न वगैरे तर सोडाच पण 'लशीसाठी तुमच्या वाढदिवसाची वाट न पाहणं हा आमचा हक्क आहे' हे सांगण्याइतकाही पाठीचा कणा नसेल तर अवघड आहे.

पुन्हा लिहीतो, आत्ममग्नता कौतुकास्पद नसते तर ती चिंताजनक असते. तो एक मानसिक आजार आहे. आणि मानसिक आजार वाढू न देता कमी करणं हे एक माणूस म्हणून आपल्या सगळ्यांचं मानवी कर्तव्य आहे. ही आत्ममग्नता या देशाला पूर्णतः खड्ड्यात घालण्याआधी नागरिक म्हणून जागे व्हा. तुमच्याच पैशातून तुम्हाला दिलेली लस 'मोफत' म्हणून तुम्हाला भिकारी ठरवावं, स्वतःच्या वाढदिवसापर्यंत वेठीला धरून मग द्यावी हे अजिबात योग्य नाही. लस ही जीवनावश्यक गोष्ट आहे, मोदी तुम्हाला वाटत असलेली खिरापत नव्हे.

आणि माध्यमं या उन्मादाचा गौरव करत असतील तर तो त्यांचा धंदा आहे असं म्हणून त्यांना माफ करून टाका. तुमच्यातला नागरिक मात्र जिवंत ठेवा. जगभरातल्या कोणत्याही पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षानं लशीशी एवढा मोठा राजकीय खेळ केलेला नाही आणि हा त्यांचा विवेक आहे, दुबळेपणा नाही.

Tags:    

Similar News