Ajit Pawar Wikipedia Edit : नेत्यांचं निधन आणि विकिपीडिया वरचा खोडसाळपणा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असताना त्यांचे विकिपीडियावरील पेजचे काही स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. का होत आहे हे फोटो व्हायरल आणि कुणी केली अजित पवार यांची प्रोफाईल एडिट जाणून घ्या पत्रकार प्रथमेश पाटील यांच्याकडून
Ajit Pawar Wikipedia Edit अजित पवारांच्या निधनाची बातमी येऊन काहीच वेळ झालाय. पण अशावेळी इंटरनेट वर आयटी सेल आणि विशिष्ट विचारांच्या घटकांचा असलेला ताबा आपल्या विकृत कारवाया थांबवताना दिसत नाही. विकिपीडिया हा एक 'सार्वजनिक' सहभागातून तयार होणारा माहितीकोष आहे. म्हणजे तुम्ही विकिपीडियाला एडिटर म्हणून अधिकची माहिती, अपडेट किंवा सुधारणा 'काँट्रीब्युट' करू शकता. भारतात अनेक अभ्यासकांचं असं निरीक्षण आहे की विकिपीडिया, क्वोरा आणि अशा इतर ज्ञानविषयक ऑनलाईन फोरम्स मध्ये एका विशिष्ट विचाराच्या आयटी सेलचा हस्तक्षेप व्यापक प्रमाणावर आणि खूप आधीपासून आहे.
अजित पवारांच्या विकिपीडिया पेजबद्दल काही स्क्रीनशॉट्स शेअर झाल्यानंतर सहज म्हणून त्यांच्या पेजची एडिट हिस्टरी तपासली. त्यामध्ये काल २७ तारखेलाच रात्री कोणीतरी 'अजित 'देवेंद्र' पवार' असा बदल केलेला दिसतो. हा बदल अर्थातच इतर संपादकांनी नंतर काढून टाकला.
त्यानंतर आज सकाळी अपघाताच्या फक्त अर्ध्या तासाच्या अंतरानं जीएमटी (ग्रिनिच मीन टाइम) ४:०४ पासून म्हणजे भारतीय वेळेनुसार ९.३४ पासून धडाधड अजित पवारांच्या निधनाबाबतचे एडिट्स सुरु होतात. त्याच्यामध्ये एका एडिट मध्ये शिवीगाळ, एका एडिट मध्ये RIP असा नावातच उल्लेख, त्यानंतर एका एडिट मध्ये मृत्यूची तारीख २७ जानेवारी असे वारंवार बदल आणि दुरुस्ती हे चक्र सुरु होतं.
त्यानंतर १०-१०.३० दरम्यान कधीतरी अचानक एक एडिट येतो, ज्यात मृत्यूचा उल्लेख २७ जानेवारी आणि पुढं 'As Predicted' म्हणजे 'भविष्यवाणी'नुसार किंवा आधी सांगितलेल्या 'अंदाजानुसार' असा उल्लेख एका निनावी खात्यानं वाढवला. हा बदल काही काळ तसाच राहिला आणि मग लवकरच दुरुस्त केला गेला.
आता अशाप्रकारच्या एंट्रीजबाबत काही व्हाट्सएप्प मेसेजेस किंवा फॉर्वर्डस सुरु झाले आहेत की काही ठिकाणी २१ तास आधीच विकिपीडियावर अजित पवारांच्या मृत्यूचा उल्लेख होता. मात्र एडिट हिस्ट्री पाहता असं झालेलं नाही. ही कॉन्स्पिरसी थियरी असण्याची शक्यताच जास्त आहे. मात्र अशाप्रकारच्या कृत्यांची चौकशी झाली तर यामागचे उद्देश समोर येऊ शकतात.
मात्र यानिमित्तानं विचारायचा प्रश्न हा आहे, की कोणाचा मृत्यू झाल्याच्या काही क्षणातच तिथं जाऊन असा खोडसाळपणा करण्याची विकृती कोणाला आणि का सुचत असावी? मागे संभाजी महाराजांबाबतही काही विकृत टिप्पणी विकिपीडियावर अशाच कोणीतरी टाकली होती. हे कोण आणि का करत असेल?
मला असं वाटतं की इतक्या संवेदनशील क्षणांमध्ये अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये जर कोणी व्यस्त असेल, तर त्यांच्या विकृतपणाची ती हद्द आहे. पण त्याचसोबत, अशाप्रकारच्या आयटी सेल्स आणि व्यक्तींना बढावा देऊन आपण एका विकृत प्रवृत्तीला बाटलीतून बाहेर काढलेलं आहे, आणि ती तुमच्यावरही उलटू शकते, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं.