राजचा धसका आणि भक्तांची धडपड

Update: 2019-04-20 10:13 GMT

राज्यात आता तिस-या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराचा धुरळा जोरदार उडतो आहे. केवळ दोन टप्पे शिल्लक राहिल्याने विरोधक आणि सत्ताधारी आपली सर्व ताकद पणाला लावून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, याची धडपड करताहेत. मात्र, या सर्व प्रचारात यंदा भाजपाचा अच्छे दिन चारा अथवा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराची एखादी टॅगलाईन प्रसिद्ध झाली नाही. तर सर्वतोमुखी झाले ए लाव रे तो व्हिडीओ. राज ठाकरे यांच्या या वेगळ्या प्रचारतंत्राला मतदारांमधून प्रचंड पसंती आणि प्रतिसाद मिळतो आहे. त्यातच राज अमुक एका पक्षाला अथवा मतदाराला मतदान करा असे थेट आव्हान करीत नसल्याने तर त्यांच्या या वाक्याला अधिक धार आली आहे. त्यामुळे राज यांची सभा आपल्या मतदारसंघात नको यासाठी युतीचे नेते आणि उमेदवार यांनी धसका घेतला असून जणू देव पाण्यात घातले आहेत. राज यांना प्रतिकार करण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी आणि समर्थकांनी हे राष्ट्रवादीचे स्क्रिप्टेड आहेत. यांना कॉंग्रेस राष्ट्रवादीने विकत घेतले आहे इथपासून ते विधानसभेत २५ जागा देण्याच्या सौद्याबदल्यात राज हे करीत आहेत असे अनेक आरोप सुरू केले आहेत.

जरी काही वेळासाठी आपण या आरोपांत तथ्य आहे असे मानले तरी तो राजकारणाचा एक भाग आहे. हे नाकारून चालणार नाही, कोणत्याही पक्षाला विस्ताराची अपेक्षा आणि त्यासाठी काही राजकीय तडजोडी कराव्या लागतात हे काही नविन नाही. जी शिवसेना मोदींना कालपर्यंत चोर म्हणत होती शहांना अफजलखान म्हणत होती ती शिवसेना शहा मोदींच्या मिठीत विसावतानाही महाराष्ट्राने पाहिले आहे. ही जर राजकीय तडजोड आपण मान्य करीत असू तर राज करत असलेली संभाव्य तडजोड का मान्य केली जात नाही. याचे कारण राज यांच्याकडे असलेल्या त्यांनी पुराव्यांसह उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजप आणि मोदी समर्थकांकडे उत्तरे नाहीत. मग काय करायचे तर प्रश्नांना उत्तरे न देता इतिहासाचा कोळसा उगाळत बसायचा, कोणाच्या तरी चाऱित्र्यांवर शिंतोडे उडवत बसायचे, वादग्रस्त वक्तव्ये करून काही काळ मूळ प्रश्नांना बगल द्यायची हा कार्यक्रम राबवायचा आणि तोही भक्तांच्या माध्यमातून. यात त्या भक्तांनाही कळत नाही की आपण कसे आणि किती वापरले जातो आहोत. राज यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे न देता 70 वर्षात या देशात काहीच झाले नाही, राहुल गांधी कसा पप्पू आहे, मोदी कसे शेर आहेत, पाकीस्तानची नांगी कशी ठेचली, मोदींच्या हातातच देश कसा सुरक्षित आहे. मोदी सोडून बाकी सर्व चोर, पवारांनी काय केले, प्रियांका गांधी वर अश्लिल कमेंट्स, पाकिस्तान संपवा, मोदी केवळ एकटा शेर ही वाक्ये पेरली जातात. गेल्या ५ वर्षांत या सरकारने देशात प्रचंड विकास केला असे सांगितले जाते पण म्हणजे नेमके काय केले हे स्पष्ट नसते, विकास केला म्हणजे नक्की काय केले? नोटबंदीचे जोरदार समर्थन करीत काळा पैसा संपुष्टात आल्याचा दावा केला जाते पण तो खरा आहे की खोटा याचा दाखला दिला जात नाही, जीएसटीची यशोगाथा गाताना व्यापा-यांना ग्राहकांना विचारले जात नाही, लाखो घरे बांधली?पण कुठे ते नेमके सांगितले जात नाही, राज्यातील सध्याच्या दुष्काळावर मात करण्यासाठी केलेली कारवाई केल्याचे सांगितले जाते पण प्रत्यक्षात चारा छावण्यांची परिस्थिती दाखवली जात नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळाला का?

प्रचंड वाढलेली बेरोजगारी, देशावर आणि राज्यावर दुपटी ने वाढत चाललेले कर्ज, रासायनिक अन्न आणि त्यामुळे होणारे दुषपरिणाम, कर्जमाफी खरोखर झाली की फक्त जाहिरात, शेतकरी आत्महत्या, सरकारी योजनाची खरोखरच अंमलबजावणी झाली का ? जाहिरातींची सत्यता किती ? पेट्रोल, डिझेल किंवा अन्य माध्यमातून होणा-या करवसूलीचे काय ? सरकारी कंपन्या बंद करुन खाजगीकरणाला मिळणारी चालना याबाबत या समर्थकांना काहीच विचारावेसे वाटत नाही. मोदी समर्थन इतक्या पातळीवर केले जाते की आपण ज्या गोष्टीचे समर्थन करतो आहोत ती खऱी आहे की खोटी मुळात ती आपल्याला तरी पटली आहे का याचा विचारही या समर्थकांच्या डोक्यात उद्भवू दिला जात नाही. भाजपला विरोध म्हणजे कॉंग्रेसला समर्थन असे गणित मांडले जाते. कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार आणि भाजप म्हणजे सदाचार भाजपामधील सिद्ध झालेल्या भ्रष्टाचाराबद्दलही ते बोलायला तयार नाहीत. ज्यांना नेहरूं बद्दल काडीचीही माहीत नाही केवळ शालेत बालदिनापुरती जुजबी माहिती असलेले लोकही बिनदिक्कतपणे नेहरूंमुळे, कांग्रेस मुळे देश रसातळाला गेला असे विधान करण्यात धन्यता मानतात आणि राहुल गांधी म्हणजे पप्पु असे म्हणत त्यांचा टोकाचा द्वेष करीत राहतात. मोदी समर्थनासाठी केवळ आणि केवळ पाकिस्तानला मोदीनीच धडा शिकवला ही मांडणी केली जाते. याआधी झालेल्या लढाया हे लोक कसे काय सोयीस्करपणे विसरतात हे समजत नाही याचे कारण आधीच्या लोकांनी देशभक्ती, राष्ट्रसुरक्षा आणि राजकारण यांची सरमिसळ केली नव्हती. त्यांनी ढोल वाजवून खोटा प्रचार केला नव्हता.

भाजपाने आणि त्यांच्या समर्थकांनी नवतमदार आणि तरूणांचे इतके ब्रेन वॉशिंग केले आहे की त्यांच्या मनात केवळ अर्धवट माहितीवर आधारित द्वेष ठासून भरण्यात ते यशस्वी झाले आहेत. हा द्वेषच आपल्याला सत्ता देईल याची खात्री त्यांना वाटते आहे. कारण सरकारला प्रश्न विचारायचे नसतात, असे प्रश्न उपस्थित करणारा एकतर विकला गेलेला किंवा देशद्रोही अशी भावना त्यांच्या डोक्यात घट्ट रुजली आहे. म्हणूनच राज ठाकरे जेव्हा सत्तेला आणि सत्ताधा-यांना प्रश्न विचारतात तेव्हा त्यांना विकला गेलेला अशी त्यांची संभावना केली जाते. पण सत्तेला प्रश्न विचारायचे असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची सत्ताधा-यांची जबाबदारी असते हे सामान्य माणसाच्या मेंदू पटलावरून पुसण्याचा पद्धतशीर प्रयत्न गेल्या पाच वर्षात करण्यात आला आहे. त्या देशज्वराने भारलेल्या मेंदूला जागृत करण्याचे काम कुणी करत असेल तर नक्कीच तो देशद्रोही नाहीतर विकला गेलेला ठरणार नाही का ?

Similar News