हिप्पोक्रिटिकल डिसेप्शन आणि डबल स्टॅंडर्डचं राजकारण
डबल स्टॅंडर्ड किंवा विकृत झुकते माप हे स्वतःच्या पक्षाला व माणसांना देणे ही विकृती सध्या राजकारणात धुमाकूळ घालत आहे. राजकारणात हिप्पोक्रिटिकल डिसेप्शन आणि डबल स्टॅंडर्डची मनोवृत्ती कशी काम करते जाणून घ्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊन्सेलर डॉ. प्रदीप पाटील यांच्याकडून…
सत्ताधारी पक्ष ruling party जेव्हा स्वतःच्या मंत्र्यांचा आणि कार्यकर्त्यांचा गुन्हा लपवू पाहतो, दुर्लक्ष करतो, तेव्हा अर्थातच ते कृत्य लोकशाही विरोधी ठरते. "राजकारणामध्ये सर्व काही माफ असते" ही म्हण खरंतर अनेक विकृतींना जन्म देत असते. जेव्हा संविधान मानायचे नसते तेव्हा आपण जे म्हणू तेच करायचे असते. ही मनमानी जी असते तिला विचार विकृती म्हणतात.
सत्ताधारी पक्षाने केलेले घोटाळे आणि गुन्हे स्वतःच माफ करणे आणि विरोधी पक्ष्यांना घोटाळेबाज ठरवणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी गुन्हे दाखल करून स्वतः स्वच्छ आहोत असा देखावा उभे करणे हे वर्तन विचार विकृतीमध्ये मोडते. 'सर्वांना समान न्याय' या तत्त्वाची धज्जी उडवण्याचे काम जेव्हा सत्ताधारी पक्ष करतो तेव्हा ते डबल स्टॅंडर्ड Double Standard करत असते.
शुद्ध मराठी मध्ये हे 'दुहेरी मानक' म्हणता येईल. यातून एक नवी प्रथा जन्माला येते. जी बेकायदेशीर असते. ती म्हणजे, आपण असे नियम तयार करतो की ज्यातून आपल्या माणसांची त्यांनी केलेल्या गुन्हेगारी कृत्यातून सुटका होईल! हे नियम संविधानाला धरून तर नसतातच शिवाय ते अन्याय व अत्याचार यांना खत पाणी घालणारे असतात. हे खत पाणी नजरेआड करून साध्य करायचे हे असते, खुर्ची टिकवणे.
सत्ताधाऱ्यांच्या प्रमुखाला येनकेन प्रकारे स्वतःचे पद सांभाळायचे असते तेव्हा अशा मर्कट चाळ्यांचा जन्म होतो. संविधान constitution हे सखोल विचार करून लॉजिक व पुरावे घेऊन तयार केले गेलेले असते. अशावेळी या लॉजिकच्या ठिकऱ्या उडवण्याचे काम सरकार करत असते. डबल स्टॅंडर्ड किंवा विकृत झुकते माप हे स्वतःच्या पक्षाला व माणसांना देणे ही विकृती सध्या राजकारणात धुमाकूळ घालत आहे.
दुसऱ्या व्यक्ती किंवा पक्ष यांच्यावर आरोप करणे, त्यांचा पर्दाफाश करणे, हे मोठ्या उत्साहाने आणि शक्य तितक्या लवकर केले जाते. पण जेव्हा तेच आरोप आपल्यावर होऊ लागतात तेव्हा ती व्यक्ती, ती संघटना, तो पक्ष स्वतःचा बचाव करू लागतात. याला 'सेल्फ इग्नोरंस' म्हणतात. म्हणजे स्वतःला दुर्लक्षित ठेवणे. स्वतःची कृत्ये जी वाईट असतात त्यांच्याकडे ढुंकूनही न बघणे. किंवा स्वतःची वाईट कृत्ये ही महत्त्वाची नाहीत असे स्वतःच स्वतःला सांगणे. हे एक प्रकारे इन्फॉर्मल रीजनिंग असते. म्हणजे आपली वाईट कृत्ये हलक्यात घेणं असतं. यामागे एक मानसवैज्ञानिक सत्य आहे. अनेक प्रयोगातून असे आढळून आले आहे की जेव्हा दुसऱ्यांच्या चुका शोधायचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्या चुका अचूकपणे शोधल्या जातात, पण स्वतःच्या चुका शोधताना अनेक चुका करण्याचा घोळ मानवी मेंदूत असतो. त्याचे कारण स्वतःच्या चुका दुसऱ्यांना दिसून येऊ नयेत याची सतत खबरदारी घेण्याची मानसिकता असते. असेही असते की दुसऱ्यापेक्षा आपण बरे आहोत किंवा चांगले आहोत असे स्वतःची समजूत घालणे. पण यातून एक गंमत घडते.
जेव्हा आपण केलेल्या वाईट कृत्यांचा कोणी समाचार घेऊ लागला तर आपण आपले वाईट कृत्य कसे चांगले आहे याचे समर्थन करू लागतो आणि हे समर्थन करत असताना आपण अशाच पद्धतीने करतो की ज्यामुळे आपण हास्यास्पद पुरावे देऊन स्वतःच्या बचाव करू शकू. सध्या सत्ताधाऱ्यांच्या प्रमुखाची आणि काही मंत्र्यांची अशी हास्यास्पद विधाने सहज दिसून येतील. यात बिनपुराव्याची उदाहरणे, अत्यंत खोटी विधाने, इत्यादी बरीच करामत दिसून येते.
आपली तत्वे, आपले विचार हे अविवेकी असताना ते विवेकी आहेत असा आव आणणारे वर्तन, ढोंग, भोंदूगिरी, दांभिकता, यांना जन्म देते. आणि सध्या तेच घडते आहे. ज्याला हिपोक्रेसी म्हणतात. यातून स्वतःचीच फसवणूक आपण करत आहोत किंवा हिप्पोक्रिटिकल डिसेप्शन करत आहोत हे लक्षात येत नाही. डबल स्टॅंडर्ड निर्माण होण्याचे कारण स्वतःला माफ करू शकेल अशी कारणे शोधून ठेवणे, भावनांच्या धुक्यात गडबड होणे, कारणे शोधताना या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे, अशी अनेक असतात.
Social psychologist Dr. Martha Fossey सामाजिक मानसशास्त्रज्ञ डॉ. मार्था फोशी ज्यांनी डबल स्टॅंडर्ड ओळखण्याची चाचणी विकसित केली आहे त्या म्हणतात की, डबल स्टॅंडर्ड हे राजकारण, स्त्री-पुरुष भेद, वंश, धर्म व जात, व गरिबी-श्रीमंती या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर दिसून येते. समान वकुबाच्या स्त्री आणि पुरुषांमध्ये स्त्रीला कमी लेखणे हे डबल स्टॅंडर्ड मध्ये येते. खास करून सेक्स करण्याचे वर्तन जेव्हा तपासले जाते तेव्हा पुरुषाला आरोप मुक्त केले जाते. नुकत्याच घडलेल्या एका डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात हे डबल स्टॅंडर्ड वापरले गेले आहे. अशी हजारो प्रकरणे सापडतील.
भारतातील जातींना वेगवेगळे न्याय जेव्हा लावले जातात तेव्हा हे डबल स्टॅंडर्ड रुजलेले असते आणि हे रुजवण्यामध्ये मनुस्मृती सारखे ग्रंथ डबल स्टॅंडर्ड चे उदात्तीकरण करत असतात. 'एकाचा असलेला दहशतवादी हा दुसऱ्याचा स्वातंत्र्यसैनिक बनतो' हे डबल स्टॅंडर्ड चे सध्याचे प्रचलित असलेले रूप आहे. दहशतवादाला स्वातंत्र्यलढा मांडणे हे डबल स्टॅंडर्ड आहे. धर्म आणि वंश याच्यामध्ये तर डबल स्टॅंडर्डने धुमाकूळ घातलेला आहे. एक धर्म दगडाची पूजा करतो म्हणून त्याला नावे ठेवायची आणि स्वतः मात्र दैवी दगड म्हणून एकत्र जमून प्रार्थना करायची हे डबल स्टॅंडर्ड चे उदाहरण आहे. सध्या जमाना डबल स्टॅंडर्डचा आहे. या गोष्टीचा धुमाकूळ चालूच राहिला तर समाजाचे अधःपतन संपूर्णपणे व्हायला फार वेळ वाट पहावी लागणार नाही.
-डॉ. प्रदीप पाटील
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट व काऊन्सेलर