Social Mediaसोशल मीडियातली बॅड न्यूज रेस, ही आता अनेक वर्ष सुरु आहे. यात निव्वळ आपल्या पोस्टला लाईक मिळणं हा हेतू असतो असं नाही. बरेचदा ज्या व्यक्तीबद्दल आपण सांगतो ती आपल्याला खरोखर आवडणारी असते. तिच्या जाण्याचं दुःख ही आपल्याला असतं. मात्र ते मनात व्यक्त करण्यापेक्षा सर्वांपर्यंत पोचवावं ही भावना असते. अशा वेळी मग घाई केली जाते, जशी काल धर्मेंद्रबाबत झाली.
सेलिब्रिटीजचा डेथ हा एक पब्लिक इन्टरेस्टचा विषय असल्याने मीडियाचं त्याकडे लक्ष असतं. शिवाय कोणाच्या तब्येतीच्या तक्रारी असल्या तर फारच. मोठ्या वृत्तपत्रांकडे तर पुर्वीपासूनच मृत्यूलेख तयार ठेवण्याची, ते अपडेट करत रहाण्याची पद्धत आहे. पुर्वी कोणतीही गोष्ट मनात आल्या आल्या जाहीर करण्याची सोय नसल्याने बातमी / लेख यांच्यावर सोपस्कार व्हायला जो वेळ मिळत असे, त्यातूनही अनेक अनर्थ टळले असतील. अलिकडे मात्र ऑथेन्टीसिटी, पेशन्स इत्यादी गोष्टी रद्दबातलच झाल्या आहेत.
जर व्यक्ती इस्पितळात असेल तर अशा ठिकाणी मीडियाचे टाय अप असतात जे त्यांना बातम्या पुरवतात. किंवा व्यक्ती पुरेशी मोठी असेल तर ते घरीही असू शकतात. बरेचदा घोळ होतात ते यातूनच. काही वेळा बातमी घाईने दिली जाते. काही वेळा व्यक्ती लाईफ सपोर्ट वर असते, काही वेळा कुटुंबाने काही व्यक्तीगत वा कायदेशीर कारणांसाठी अधिकृत अनाउन्समेन्ट केलेली नसते. पण मीडियाचे हेर हे बायपास करुन बातमी बाहेर काढतात ज्यात सर्वांना मनस्ताप होतो. अशा वेळेआधी पसरलेल्या बातम्या आप्त आणि चाहते यांना अतिशय क्लेशकारक असू शकतात हे लक्षात घेतलं जात नाही. आज धर्मेंद्रला डिस्चार्ज मिळाल्याची बातमी आहे. त्यामुळे कालचा घोळ याही पलीकडचा असणार हे उघडच आहे.
कालची बातमी वर्तमानपत्रांपर्यंत पोचली होती. आणि ती पाहून जर लोकांनी आपलं दुःख व्यक्त केलं असेल तर त्यात मला काही गैर वाटत नाही. तो सोर्स हा आपण खराच मानायला हवा. पण तो तसा मानला जातो याची वृत्तपत्रांनी किंवा त्याहीपेक्षा त्यांच्या ऑनलाईन शाखांना जाणीव आहे का ? परदेशात जेव्हा अशी बातमी वृत्तपत्रात येते तेव्हा त्यांना ती मागे घ्यायला लागल्याचं मी तरी ऐकलेलं नाही. कळलय ते खरंच आहे याची खात्री करुन घ्या. व्यक्तीचं काम, तिची माहिती याबद्दल अभ्यासपूर्ण लिहा, प्रेमाने लिहा. या स्पर्धेत पहिलं आल्याने कोणी तुमचं कौतुक करणार नाही, आणि बातमी चुकली असेल तर होणारी बदनामी अधिक असेल.
इतरांनीही खात्रीलायक सोर्स कडून कळल्याशिवाय शोकसंदेश व्हायरल करण्याची घाई करु नये. सर्वांनाच दुःख आहे. अशा प्रसंगी ‘आपदा में अवसर’ शोधणारे मात्र कोणालाच आवडत नाहीत. धर्मेंद्रची बातमी चुकली हा आनंद आहे. हा मोठा काळ गाजवलेला नायक आहे. तो असेल तितके दिवस चाहत्यांना हवाच आहे.
- गणेश मातकरी