भिडेवाडयाचे जतन करण्यासाठी समितीचे गठन...

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या संदर्भात लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक हरी नरके यांनी माहिती दिली आहे.

Update: 2021-02-13 04:14 GMT

भिडेवाड्याच्या वास्तुचे जतन व संवर्धन करण्यासाठी ही वास्तु राज्य संरक्षित स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या २० वर्षांपासून सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करावे अशी सूचना आजच्या बैठकीत देण्यात आली आहे.

भिडेवाडा ही वास्तु खाजगी मालकीची आहे. तसेच या वास्तुत राहणाऱ्या भाडेकरुंनी न्यायालयात धाव घेतल्याने सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्वरित समिती नेमण्यात यावी. या समितीमध्ये नगरविकास, सांस्कृतिक कार्य आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा समावेश असावा. सदर समिती भिडेवाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी तसेच याप्रकरणात न्यायालयाच्या बाहेर सर्वसंमतीने काय करता येईल याबाबतची शक्यताही तपासण्यात यावी. अशा सूचना करण्यात आल्या.

येत्या 15 दिवसात पुन्हा बैठक लावण्यात येणार - अमित देशमुख

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबरच येत्या 15 दिवसात याविषयाबाबत पुढील बैठक बोलावण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच पुढील बैठकीसाठी संबंधित विभागांबरोबरच ॲडव्होकेट जनरल यांनाही बोलविण्यात येईल. फुले दाम्प्त्याने भिडेवाडा येथे सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची वास्तू सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागामार्फत राज्य स्मारक म्हणून घोषित करण्यासंदर्भातही शासन सकारात्मक असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आमदार रोहित पवार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाचे काम पाहणारे संबंधित अधिकारी यांच्यासह नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tags:    

Similar News