बिकिनी, बॉलिवूड आणि बॉयकॉट: विवेक ठाकरे

कोरोनाच्या ( Covid19) संकटात अनेक उद्योगांना फटका बसला.. सर्व क्षेत्र पूर्वपदावर येत असताना ठराविक चित्रपटांवर (Bollywood) बॉयकॉट करून खेळ खेळला जात आहे.. हा बॉयकटचा खेळ कदाचित भविष्यात जागतिक पातळीवर भारताला पोळवेल.. प्रत्येक गोष्ट धर्मजातीत तोलायला लागले तर धर्मच अस्तित्वात राहणार नाही.. असा परखड इशारा अँड. विवेक ठाकरे यांनी दिला आहे..

Update: 2022-12-20 05:22 GMT


करोनाचा कालखंडात चित्रपटसृष्टीसह अनेक उद्योग ऊध्वस्त झाले. लोकांचे रोजगार गेले. आता कुठे चित्रपटसृष्टी पुन्हा सावरत आहे, उभी रहात आहे. लोकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. त्यात हा। "बॉयकॉट"चा हा नवा खेळ सुरु झाला आहे. अमिर खानचा 'लालसिंग चड्डा' असाच पाडला, नव्हे नितांत सुंदर कलाकृती संपवली. ब्रम्हास्त्रच्या वेळीही हाच प्रयोग झाला. मात्र बॉयकॉट करूनही हे ब्रम्हास्त्र आकाशात झेपावलेच.

आता हे 'बॉयकॉट ट्रोलर्स' 'पठाण'च्या मागे लागलेत. म्हणे काय तर दिपिकाची बिकिनी भगवी आहे. येथे बिकिनीचा प्रॉब्लेम आहे की भगव्या बिकिनीचा आहे की शाहरुख "खान"चा आहे हे समजायला मार्ग नाही. कारण रामदेव बाबाचे भगवे लंगोट कधी आमच्या धर्माच्या आड आले नाही. बिकिन्या काय आज आल्यात पिक्चरमध्ये?.. संस्कारी कालखंडात "राम तेरी गंगा मैली" म्हणत मंदाकिनीच्या पिक्चरने खळबळ माजवली होती. तेव्हापासूनच पारदर्शकतेनंतर बिकिन्यांचा प्रवास सुरु झाला. आता तर मोबाईल हातात घेतला की अश्लीलतेचा भाडीमार सुरु होतो. पोर्न स्टार आपल्या हिरोईन झाल्या आहेत. बिकिनीच प्रॉब्लेम असेल तर गेली 8 वर्षे संस्कारी सरकार आहे. मग आतापर्यंत बिकिनीवर का नाही बंदी घातली?

चित्रपटाचे सेंसॉरशिप आता ट्रोलर्स करू लागले आहेत. मग सेंसॉर बोर्ड कशाला आहे?.. सरकारने आपली आवडीची माणसे तिथे बसवली आहेत. काय खात्री लावायची आहे ती तिथुन लावा. सेंसॉर बोर्डाने A/U प्रमाणपत्र दिल्यावर ही टोलधाड कशासाठी हवीय? पठाणमधील बिकिनी निमित्त आहे. येथे प्रॉब्लम बिकिनीचा वाटत नाहीये....बाईने कमी कपडे घालू नयेत याचा वाटतो आहे. हळूहळू तीही सांस्कृतिक सेंसॉरशिप येवू घातली आहे.

बरं, बॉयकॉट करून चित्रपट पाडायला क़ाय यात फक्त शाहरुख खानच हिरो आहे ? अभिनेता सोडला तर निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक, गीतकार, संगीतकार, हिरोईन, इतर हिरो यांच्यासह सेटवर शेकडो जणांची टीम असते. मार्केटिंग, प्रमोशन करणारे हजारो लोक असतात. तर हा चित्रपट ज्या थिएटरमध्ये प्रदर्शित होतो ती देशभरातील हजारों थिएटर, तेथे काम करणारे लाखो कर्मचारी अशी सगळीच माणसांचे भवितव्य चित्रपटाच्या यशा - अपयशावर अवलंबून असते. तसेच अशा प्रकारच्या व्यवसायिक चित्रपटातून प्रचंड मोठा कररूपी पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होत असतो. शाहरुख खान हा देशातील सर्वात मोठा टैक्स पेअर आहे. त्यामुळे अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद उभा करून चित्रपट पाडणे हे विकृत मानसिकतेचे लक्षण आहे. विशिष्ट विचारसरणीने प्रेरित होऊन ही लोक काम करत असतात. त्यामुळे सरकारने तत्काळ यावर कायदयाचा बडगा उभारुन आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

हा सांस्कृतिक सेंसॉरशिप लादायचा प्रकार आहे. यामाध्यमातून क़ाय खायचे - क़ाय खाऊ नये, क़ाय पहायचे - क़ाय पाहू नये, क़ाय दाखवायचे - क़ाय दाखवू येथून तर अंगात क़ाय घालायचे - क़ाय घालू नये नये इथपर्यंत हा प्रवास येवून ठेवला आहे. सद्या बॉलिवूड जात्यात आहे, बाकी सर्व सांस्कृतिक क्षेत्र सुपात आहेत हे कुणीही विसरु नये. पठाण, लाल सिंग चड्डाच्या निमित्ताने मुस्लिम अभिनेत्यांना ट्रोलर्सच्या माध्यमातून टार्गेट केले जात आहे.. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर त्याचे लोण हळूहळू खाली झिरपत सर्वांपर्यंत येणार आहे. त्यामुळे आता 'पठाण' जळत असताना जे अभिनेते - अभिनेत्री, दिग्दर्शक, लेखक, साहित्यिक, सांस्कृतिक - सुजान प्रतिनिधी तोंडात मुग गिळून गप्प बसले आहेत त्यांनी कायम लक्षात ठेवावे की, पुढचा नंबर आपलाच आहे.

सरकारच्या उघड किंवा छुप्या आशिर्वादाशिवाय ही धर्मांधतेची आग लागणे - पसरणे शक्यच नाही. ट्रोलर्सची टोलधाड कंट्रोल करणे सरकारच्या हातात आहे. मात्र सरकारच जर हा सांस्कृतिक दहशतवाद पोसत असेल तर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय पातळीवर याची जबरदस्त किंमत देशाला मोजावी लागू शकते. त्यामुळे आम्ही कुणालाही धडा शिकवू शकतो या भ्रमात सरकारने राहु नये. तुम्ही लावलेल्या आगीची मजा तुम्ही घेत बसाल तर भविष्यात याचा आगडोंब झाल्यानंतर ती तुमच्याही नियंत्रणात राहणार नाही. प्रचंड मताधिक्याने आलेले सरकारच जर फक्त जर हिंदू - मुसलमान करत राहिले आणि प्रत्येक गोष्ट जर धार्मिक तराजूत तोलायला लागले तर सरकारचा "धर्म" शिल्लकच राहणार नाही.. शेवटी,

"लगेगी आग तो आएंगे घर कई ज़द में
यहां पे सिर्फ़ हमारा मकान थोड़ी है"...


- अ‍ॅड. विवेक ठाकरे

Tags:    

Similar News