Agricultural Technology Innovations : शेतकऱ्यांच्या हाती जास्त पैसा कसा खेळेल ?

शेती क्षेत्रातील अनिश्चितता, पाण्याचे नियोजन, महागडं तंत्रज्ञान अशा विविध गोष्टींवर व्यापक चर्चेची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व्रतस्थ भावनेने काम करत जैन समूहाने अनेक उत्पादने बाजारात आणली. नफा कमवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या हाती जास्त पैसा कसा खेळेल याकडे भवरलाल जैन यांचा कल असायचा. शेतीला आधुनिकतेची जोड देणाऱ्या जैन समूहाच्या वाटचालीचा आढावा घेणारा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांचा लेख पुन:प्रकाशित करत आहोत.

Update: 2026-01-22 11:28 GMT

भलं करत जा, भल्याचे धनी व्हा.. Jain Group जैन उद्योगसमूहाने या मंत्रावर आजपर्यंत आपलं काम उभारलं आहे. agricultural शेती क्षेत्राबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. या क्षेत्रातील ज्या समस्या आहेत, त्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विविध स्तरावर काम होत असतं मात्र एकाच छताखाली या सर्व समस्यांचं उत्तर सापडत नाही. कृषी मूल्य साखळी निर्माण झाल्याशिवाय शेतीचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे समस्यांना गोंजारत न बसता त्यावर अतिशय व्यवहार्य आणि किफायतशीर उपाय शोधणे गरजेचं होते, यात Jain Group जैन उद्योगसमूहाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करून पुढाकार घेतला आणि agricultural sector शेती उद्योगाचा चेहरा बदलू लागला.

Farmers शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळायचा असेल तर त्याची शेती चांगली झाली पाहिजे, किफायतशीर असली पाहिजे, शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे, त्याला बाजार मिळायला हवा.. हे सगळं व्हायचं असेल तर पारंपारिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याचं नियोजन करता यायला पाहिजे, त्यासाठी त्यांना नैसर्गिक संसाधनांबरोबरच आधुनिक तंत्रज्ञान ही परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाले पाहिजे, सभोवताली मुबलक असलेल्या सूर्य प्रकाशाला ही आपला साथीदार करता यायला पाहिजे. आधुनिकतेच्या या भूकेतूनच मग एक परिवार उभा राहिला जो आज जगभर शेतीच्या प्रयोगासाठी मैलाचा दगड ठरला आहे. शेतकऱ्यांचं आणि शेतीचं चित्र बदलणारा उद्योगसमूह म्हणून आज जैन समूहाला ओळखलं जातं. जळगावातून सुरू झालेला हा उद्योग आज जगभरात पोहोचला आहे. अनेक गावे, शहरे एखाद्या व्यक्ती, उद्योग समूह किंवा तेथील वेगळेपणामुळे ओळखली जातात. व्यक्ती अथवा संस्थांचे कर्तृत्व इतके मोठे आणि भूषणावह असते की, तो उद्योगसमूह वा व्यक्तीच शहराची ओळख बनून जाते. यात शून्यातून विश्व निर्माण करणारे शिल्पकार! जळगावचे नाव सातासमुद्रापार नेणारे भवरलालजी जैन व जैन उद्योग समूह म्हणता येईल. जळगावात या उद्योगसमूहाने 12 हजारांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून एक विश्वासार्हता जपलेली आहे. पाईप, ठिबक आणि टिश्युकल्चर अशा क्षेत्रात जैन समूहाचं नाव जनमानसात रूजलं आहे. हा केवळ व्यवसाय-उद्योग न राहता शेतकऱ्यांच्या जीवनाचा अंग बनला आहे. 

शेती, पाणी, ऊर्जा, पर्यावरण आणि एकूणच सर्व उत्पादने ही मानवी कल्याणाचा विचार करूनच सुरू केले आहेत. कृषी मूल्य साखळी निर्माण करणारी एकाच छताखाली कृषिविषयक सर्व समस्यांचे उत्तर येथे मिळते. यालाच "वन-स्टॉप-हाय-टेक ॲग्री शॉप" म्हटले जाते. त्याच प्रमाणे कांदा या अशाश्वत पिकासाठी ‘करार शेती’ च्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमी भाव दिले जातात. करार शेतीचे यशस्वी मॉडेल जैन इरिगेशनने विकसीत केले आहे. या करार शेतीचा विस्तार भविष्यात होईल मसाल्याची पिके, फळे इत्यादींची खरेदी करण्याचे उद्दिष्ट देखील आहे. एखादी संकल्पना लोकांपर्यंत नेण्याआधी त्यावर सखोल अभ्यास करून त्यातील जोखीम कमी करण्याकडे आमचा भर राहिला आहे. डोळे झाकून एखादं उत्पादन घेता यायला पाहिजे, त्यात फसवणूक होता कामा नये या धोरणावर कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कंपन्यांनी काम केलं पाहिजे. जैन समूहाने हे निकष सातत्याने पाळले. 

कृषी क्षेत्राला नवा आयाम देण्याचं काम करणाऱ्या जैन समूहाने सातत्याने नाविन्याची कास धरली. जगात २५०० मि.मी. व्यासाचा भला मोठा पाईप बनविणाऱ्या मोजक्याच कंपनीत जैन पाईपचा समावेश असणे अभिमानाची बाब म्हणता येईल. गुणवत्ता, उत्कृष्टतेसाठी कंपनीचे अथक कार्य सुरू आहेत. ज्या व्यावसायिकांचा भर स्वतःचं काम करण्यासोबतच त्या क्षेत्राच्या विकासासाठी संशोधन करण्यावर राहतो, तेच दीर्घकाळ स्पर्धेत टिकतात. त्याचमुळे जैन समूहाचा सर्वात जास्त भर हा संशोधनावर राहिला आहे, त्याचमुळे संशोधन आणि विकास यांची योग्यरित्या सरमिसळ केली आहे. कंपनीच्या आर ॲण्ड डी विभागाचे कार्य ही मोलाचे ठरले आहे. संशोधन कार्याबद्दल देशाचे सर्वोच्च R&D पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार पारितोषिके मिळालेली आहेत. 

कंपनीच्या इतर व्यवसायांचे पाहिले तर पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन कसं होईल याकडे आम्ही प्राधान्याने लक्ष पुरवलं,  पीव्हीसी शीट्स, सोलर वॉटर हीटर्स, सोलर वॉटर पंप, पीव्ही पॅनल्स आणि सोलर लाइटिंग इत्यादी उपकरणे हे निसर्ग जपण्याचे काम करतात. जंगल आणि ऊर्जा यासारख्या दुर्मिळ नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनावर कंपनीचा भर किंवा प्राधान्यक्रम आहे. उदाहरण द्यायचे तर पीव्हीसी शीट्स बांधकाम साहित्याचा, लाकडाचा पर्याय उभा केला आहे. ग्राहकांनी आपली ही उत्पादने वापरणे म्हणजे जंगले वाचविणे होय. सोलर वॉटर हीटर्स आणि फोटोव्होल्टेइक लाइटिंग सिस्टीम मोफत उपलब्ध असलेल्या मुबलक सौरऊर्जेचा वापर करून विजेची निर्मिती होते. गॅस, ऑईल-पेट्रोल, कोळसा सारख्या नैसर्गिक स्रोतांची बचत करण्यात ही विविध ऊर्जासाधने महत्त्वाचे काम करतात.

जळगाव म्हटले म्हणजे 'जैन इरिगेशन’ जैन पाईप, जैन ठिबक ही प्रतिमा अनेकांचा मनात, हृदयात निर्माण होते. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी १९६३ पासून 'जैन ब्रदर्स’ रुपाने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. सचोटी, प्रामाणिकपणा, अपार कष्ट आणि सतत घेतलेला नावीन्याचा ध्यास या चतुःसुत्रीच्या आचरणामुळे कंपनीने हा लौकिक मिळविलेला आहे. लोकशिक्षणाअभावी पाणी बचतीच्या या तंत्राला शेतकऱ्यांनी सुरूवातीला नाकारले. नेमका हाच धागा पकडून जैन इरिगेशनने सुरूवातीपासून लोकशिक्षणावर व कृषी विस्तार यावर भर दिला. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जागृतीत झाला. सूक्ष्म सिंचनाच्या एकूण व्याप्तीत सद्यस्थिततीत भारतातील ५५ टक्के वाटा हा एकट्या जैन इरिगेशनचा आहे. या सगळ्या कार्याची शासनाने दखल घेतली, २००८ मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्रीने गौरव केला.

१९६३ मध्ये 'जैन ब्रदर्स' रुपाने कृषी उद्योग-व्यवसायाची भवरलालजी जैन यांनी मुहूर्तमेढ रोवली. केरोसीन, क्रुड ऑईल, शेतीला लागणारे खते, बी-बियाणे, ट्रॅक्टर्स, कृषिला लागणारे संसाधने यांची विक्री केली गेली. ट्रेडिंगचे काम १९६३ ते ७८ पर्यंत चालले. त्यावेळी जनसामान्यांमध्ये 'जैन ब्रदर्स’ हा ब्रॅण्ड नावाजला. १९७८ नंतर कंपनीने औद्योगिक क्षेत्रात दमदार पाऊल ठेवले. जैनने 'पपेन'ची निर्मिती करून जगातले सर्वात जास्त आणि गुणवत्तापूर्ण शुद्धता असलेले पपेन निर्माण करून 'जैन’ हे नाव जगभर पोहोचविले. वास्तविक पाहता सहकारी तत्त्वावर गत १२ वर्षांपासून बंद पडलेला केळी पावडर बनवायचा हा कारखाना 'जैन ब्रदर्स’ने विकत घेतला होता. पपेनची निर्मिती करून उद्योग क्षेत्रातील ही वाटचाल आश्वासक अशीच ठरली. 1980 मध्ये 'जैन पाईप' ही ओळख निर्माण केली. जैन पाईप थेट शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत आणि थेट हृदयात पोहोचला. नंतर 'जैन ठिबक’ने तर सिंचन क्षेत्रात जणू क्रांतीच केली. शेतीमध्ये अत्याधुनिक पद्धतीने जलव्यवस्थापनाचे तंत्रज्ञान वापरले जाऊ लागले. जलबचतीचा हा मंत्र मोलाचा ठरला. हळूहळू 'जैन ठिबक’ हे उत्पादन देखील चांगलेच लोकप्रिय ठरले. सुरवातीच्या काळातच जगातील ठिबक सिंचन संच उत्पादकांमध्ये 'जैन ठिबक’चा पहिल्या १० मध्ये नंबर होता. 

आज जैन ठिबकचा भारतात पहिला क्रमांक आहे. जगाच्या पातळीवर जैन ठिबक दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतकेच नव्हे तर यूएसएमध्ये ही जैन प्रथम क्रमांकावर आहे. प्लास्टिक पाइप्स बनविणारी जैन कंपनी भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. जगामध्ये आंब्यावर प्रक्रिया करणारी सर्वांत मोठी एक नंबरची कंपनी जैनच आहे. अन्न प्रक्रिया उद्योगात 'जैन फार्म फ्रेश फूडस्’चा लौकिक देखील अल्पावधीत चांगलाच ठरला. जागतिक पातळीवर कृषी पंप बनविणाऱ्या उद्योगाच्या विश्वात 'जैन सोलार पंप' पहिल्या क्रमांकाचा होय. केळी आणि डाळिंबाच्या टिश्युकल्चर रोपांची निर्मिती करणारी 'जैन टिश्युकल्चर’ ही पहिल्या क्रमांकाची कंपनी आहे. कांदा व भाजीपाला प्रक्रिया करणारी जगातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी देखील 'जैन' ठरलेली आहे. 

जगभरातील १२६ हून अधिक देशात सुमारे ८५ लाख (८.५ मिलियन) शेतकऱ्यांपर्यंत 'जैन'ची विविध उत्पादने पोहोचलेली आहेत. त्यासाठी देश-विदेशात ३३ कारखाने, ११ हजाराहून अधिक डिलर, डिस्ट्रीब्युटर्स यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत 'जैन’ ची उत्पादने पोहोचलेले आहेत. कंपनीची स्वतंत्र ओळख त्या त्या ब्रॅण्डने देखील होत असते. सामाजिक क्षेत्रात गांधी रिसर्च फाउंडेशन, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, अनुभूती स्कूल, कांताई नेत्रालय, जैन स्पोर्टस् अकॅडमी यांचा समावेश आहे. मायक्रो इरिगेशन सिस्टिम्स् आणि संसाधने - ‘मोअर क्रॉप पर ड्रॉप’ या टॅग लाईन वर जैन ड्रीप, जैन स्प्रिंकलर्स, जैन रेन पोर्ट, जैन ड्रीपकीट, असे एक दोन नव्हे तर तब्बल २६ नोंदणीकृत ब्रॅण्ड आहेत. प्लास्टिक प्रॉडक्टस् - ‘युवर लाईफ लाईन टू प्रॉस्पेरिटी’ या ब्रीद वाक्यात जैन पाइप, जैन पीई पाइप्स, जैन कॉलम पाईप, जैन केसिंग पाईप्स असे सगळे मिळून १३ ब्रॅण्ड आहेत. ग्रीन एनर्जी प्रॉडक्टस् - ‘जॉइंट व्हेंचर वुईथ नेचर’ या टॅगलाईनवर जैन सोलर पंप, जैन पिव्ही पॅनल्स असे एकूण 6 ब्रॅण्डस् आहेत. फूड प्रॉडक्शनमध्ये 'युवर रेसिपी फॉर ग्रेट टेस्ट’ या ब्रीदवाक्यावर जैन फार्म फ्रेश, आमरस, फ्रु टू गो, व्हॅली स्पाईस इत्यादी मिळून १२ ब्रॅण्डस् 'जैन’ कंपनीच्या नावे आहेत.

कंपनीबाबत महत्त्वाच्या बाबी -

देश आणि जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात घोडदौड सुरू असतानाही भूमिपुत्रांच्या कल्याणाचा ध्यास आम्ही कधी सोडला नाही. श्रमप्रतिष्ठेचा अंगीकार करून आदर्श कार्य संस्कृतीचा पाया रचला. ६५ एजन्सीतून सुरू झालेला उद्योजकीय प्रवास कंपनीचे स्वतःचे कारखाने, प्रकल्प, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानमान्यतेपर्यंत पोहचला. या सर्व प्रवासात सामील असलेल्या सर्वच लोकांना आम्ही विकासाचं भागीदार मानलं. 

आज जैन समूह शेती व शेतकऱ्यांच्या अजोड बांधिलकीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. १८ कारखाने, १४६ कार्यालये व डेपो, ११,००० वितरकांच्या जाळ्यासह १२,००० हून अधिक सहकारी वार्षिक ७,९०० कोटीहून अधिक उलाढाल असलेली ही बहुराष्ट्रीय कंपनी आहे.

कृषी पाईप यांसहित ठिबक सिंचन उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेला हा समूह टिश्यू कल्चरच्या क्षेत्रात ही अग्रेसर आहे. 

केळी व डाळिंबाच्या टिश्युकल्चर रोप निर्मितीत जैन समूह अग्रेसर आहे. वर्षाला सुमारे २० कोटी टिश्युकल्चर रोपांची निर्मिती जैन समूहाकडून केली जाते त्यात एकट्या केळीची १३ कोटी रोपांची आहे. आंबा फळ प्रक्रियेतही कंपनीचा प्रथम क्रमांक आहे. जर ठरवलं तर काय होत नाही, शेती क्षेत्रातील सर्व आव्हानांना, समस्यांना आम्ही कुशलतेने संधीत परावर्तीत करत गेलो.  आणि शेती अधिक समृद्ध कशी होईल, शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा खेळेल यासाठी जैन समूहाने सातत्याने काम केलं.

Similar News