मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. 21 जुलैला स्वप्निल जोशीकडे असलेल्या पार्टीमध्ये मी गेले होते तेव्हा माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं की दुसऱ्या दिवशी माझं आयुष्यच बदलून जाणार आहे. रात्री साडेअकरा वाजता माझ्या छातीत दुखत असल्यामुळे मला ऍडमिट केल्या गेलं.. पण काही टेस्ट्स केल्यावर हृदयाशी संबंधित काही नाही असं कळलं.
बाकीच्या टेस्टस आणि स्कॅनिंग केल्यावर कळलं की मला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर झाले आहे. लिव्हरचा त्रास हा बहुतेकदा खूप दारू प्यायल्याने होतो, असा समज आहे पण तो चुकीचा आहे.. कारण त्याचे दोन प्रकार आहेत एक अल्कोहोलिक फॅटी लीवर आणि दुसरा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर... जो शुगर मुळे होतो.. मला गेली 25 वर्ष टाईप टू चा डायबिटीस आहे.
या क्रोनिक शुगर ने माझ्या लिव्हरवर अटॅक केला आणि सुदैवाने मला कळलं की, आपल्याला स्टेज टू चे फॅटी लिव्हर झाले आहे. टाईप टू चा डायबेटीस स्ट्रेस मुळे होतो.. आमच्या क्षेत्रामध्ये प्रचंड टेन्शन आहे आणि त्यातून माझा स्वभाव टेन्शन घेण्याचा आहे...असो...!
डॉक्टरांनी विचारलं तुम्ही काय करता हेल्थ साठी.. व्यायाम करता ? योगा करता ? चालता ? मी म्हटलं नाही मला वेळच मिळत नाही, कारण माझं काम सगळं बसून आहे... येण्या जाण्यातच खूप वेळ जातो.. गेली अनेक वर्ष लोअर परेल ला जायला दोन तास, यायला दोन तास मीटिंगमध्ये पाच-सहा तास आणि घरी येऊन लिहायला परत बसायलाच लागत होतं.. आणि जोपर्यंत आपल्याला काही होत नाही तोपर्यंत आपण काय गरज आहे असं म्हणतो.. वाटेल ते खातो ..व्यायाम करत नाही.. तेव्हा डॉक्टर माझ्यावर चिडले आणि म्हणाले,” आपको शरम नहीं आती है.. आपकी एक भी रिपोर्ट अच्छी नहीं है. जिनकी घुटनों की सर्जरी हुई होती है.. वो भी लाठी लेकर चलते हैं.. तीन महिने के अंदर सिक्स केजी वजन कम करना है आपको ..अगर आपको जिंदा रहना है तो..” मी एकदम ताडकन जागी झाले.
मला खायची अत्यंत आवड आहे आणि आम्ही विदर्भाकडचे असल्याने तिखट आणि तेलकट खायला खूप आवडतं..! ही प्रचंड मोठी शिक्षा मला ठोठावण्यात आली. त्यानंतर मी मनाशी ठरवलं की वजन कमी करायचं आणि डायट करायचं.
मुख्य म्हणजे शुगर कंट्रोल मध्ये ठेवायची होती.. काही झालं तरी तुमची शुगर वाढता कामा नये ..रोज शुगर आणि वजन बघा असं डॉक्टरांनी बजावलं होतं. हॉस्पिटलच्या डायटीशियननी दिलेलाच डायट मी फॉलो केला. हळूहळू शुगर आणि वजन कंट्रोल मध्ये येऊ लागलं. काम पूर्णपणे बंद केलं गेलं वर्षभर मी काहीच लिहिलं नाही.. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सुद्धा दोन महिनेच लिखाण केले...!
वजन कमी व्हायला लागलं की, आपल्याला आपोआपच उत्साह वाटायला लागतो आणि आपण अधिक सिन्सिअर होतो. खूप जणांना असं वाटलं की, मी फक्त बारीक होण्यासाठी वजन कमी करते आहे. त्यांना माझी मेडिकल कंडिशन माहित नव्हती. खूप कठीण होता हा एक वर्षाचा प्रवास.. कारण तुम्ही जेव्हा घरी असता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही.. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाता आणि इतर लोक तुमच्यासमोर चमचमीत पदार्थ खातात, तेव्हा तुमची खरी कसोटी असते.. आज माझं १३ किलो वजन कमी झालं आहे. कुठलंही इंजेक्शन न घेता.. कुठल्याही गोळ्या न घेता.. कुठलीही सर्जरी न करता.. हा प्रवास खरंच सोपा नव्हता.. खूप त्रास झाला.. प्रचंड केस गळले.. चेहरा निस्तेज झाला. जेव्हा वजन कमी होतं तेव्हा मसल लॉस सुद्धा होतो आणि आपले हात पाय दुखायला लागतात. पण मी निश्चयाचा महामेरूच केला होता.
बहिण, भावाने, वहिनीने खूप प्रोत्साहन दिलं.. कौतुक केलं .. पण असेही काही जण असतात..कोणी वजन कमी केलं तर त्याचं कौतुक न करता त्यांनी ऑपरेशनच केलं असेल त्यानी इंजेक्शनच घेतली असतील, असं तोंडावर देखील बोलायला कमी करत नाहीत.. मी ही पोस्ट यासाठीच लिहिली आहे की, बारीक होण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी कुठल्याही सर्जरीची गरज नाही.. कुठल्याही तऱ्हेचे ड्रग्स किंवा ऑपरेशनची गरज नाही.. तुमच्या मनाचा निग्रह हवा.. तोंडावर ताबा हवा.. कारण 60% वजन हे तोंडावर ताबा ठेवल्यानेच कमी होते. ज्यांना गरज नाही त्यांनी असं करायची गरज नाही पण थोडा ताबा ठेवणे गरजेचे आहे.. कारण अचानक एखादा रोग झाल्याचे तुम्हाला कळतं आणि मग नंतर पश्चाताप होतो.
आधी माझी बहीण आणि माझा भाऊ मला सतत सांगत होते, रोहिणी थोडसं चाल.. थोडा व्यायाम कर .. पण तेव्हा मला राग यायचा असं वाटायचं मी कुठे एवढी जाड आहे. माझं वजन 65 किलो होतं पण मला स्वतःलाच त्याची जाणीव नव्हती.. पण आता असं वाटत आहे की तेव्हा मनावर घेतलं असतं तर आज आवडीचं खाणं संपूर्णपणे बंद झालं नसतं.
गेल्या एका वर्षांत मी दोनदाच डॉक्टर कडे गेले.. परवा मी त्यांना शेवटी विचारलं डॉक्टर मैं जंक फूड खा सकती हूं क्या.. त्यावर ते स्वतःहूनच म्हणाले म्हणजे बटाटे वडा का.. मी त्यांना म्हटलं हो माझा वीक पॉईंट आहे.. मी घरच्या तेलातच बनवून खाईन.. त्याच्यावर ते म्हणाले बटाटे वडा बटाटे वडा होता है , चाहे घर का बना हो चाहे बाहेर का ..! अगर खाया भी तो आपको कॉम्पेसेंट करना पडेगा.. रात को सिर्फ सूप या सलाड.. आता मी थोडे थोडे चीटिंग करत आहे.. म्हणजे पोहे खावेसे वाटले तर एक छोटी वाटी.. सगळं काही एक एक चमचा.. चवीपुरतं...!
मी आता माझी कॉलर ट्यून बदलून मैं यहां टुकडों पे जी रही हूं..अशी करून घेणार आहे.. तुम्हाला कल्पना नसेल कदाचित पण प्रत्येक गोष्टीमध्ये साखर म्हणजेच ग्लुटन आहे.. पोहे, रवा ,साबुदाणा बटाटा, कणिक ,मैदा, बिस्किटे, फरसाण, चिवडा, चकली ,गोड, दूध, मुरमुरे इडली, डोसा.. सर्व फ्राईड वस्तू.. कधी बाहेर गेले तर मला प्रश्न पडतो की काय खायचं.
आपल्याकडे बाकीच्या रोगांविषयी अवेअरनेस आहे पण लिव्हर विषयी एवढा नाही असं माझ्या लक्षात आलं, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की, मला लिव्हरचा काही आजार होईल.. तेव्हा सांभाळून राहा. सगळं मर्यादेत ठेवणं गरजेचं असतं...काय होतं म्हणून उडवून लावू नका कारण रोग झाल्यावर जे काही भोगावं लागतं, जो काही खर्च होतो, कधी कधी दुसऱ्यावर अवलंबूनही राहावं लागतं हे टाळायचं असेल तर प्लीज प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी... असं काळजीने आणि प्रेमाने सांगावसं वाटतं..!
रोहिणी निनावे, प्रसिद्ध लेखिका