महात्मा फुले मला का भावतात..... ?
महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त लेखक हेरंब कुलकर्णी यांचा लेख
आज महात्मा फुले स्मृतिदिन. मला महात्मा फुले मला भावतात कारण -
१) ते विचारही करतात आणि कृतीही करतात. जग जेव्हा उत्तर शोधील तेव्हा शोधील पण आज मला जे सुचते आहे ती कृती मी माझ्यापुरती करील ही त्यांची मनोभूमिका मला भावते. त्याअर्थाने ते one man army आहेत.
२) ते एकाचवेळी व्यवस्था बदलाचे लांबचे उत्तर सांगतात आणि जवळची करायची कृतीही करतात think globally act locally चे ते प्रतिक आहेत.
३) ते एकाचवेळी शिक्षण, धर्म, परंपरा, शेतकरी, स्त्रिया, राजकारण, शोषण ,साहित्य या जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर भाष्य आणि कृती करतात.त्यामुळे ते जीवनव्यापी तत्वज्ञ आहेत. ते समग्र परिवर्तनाची मांडणी करतात.
४) हंटर कमिशन ते गुलामगिरी आसूड व प्रत्येक आंदोलनापर्यंत वंचित समूह हाच त्यांच्या सर्व मांडणीचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक मुद्दा मांडणी करताना ते शेवटच्या माणसापर्यंत नेतात. वंचित हाच त्यांच्या चिंतनाचा गाभा आहे
५) एका मध्यमवर्गीय जातीय वर्तुळात अडकलेले शिक्षण त्यांनी मुक्त केले.शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या समूहाकडे सतत लक्ष वेधले त्यामुळे आज वंचित समूह ,जाती आणि स्त्रिया यांचा सहभाग वाढून आजचा समाज अधिक एकजिनसी झाला.याचे श्रेय त्यांना आहे.
६) एखाद्या प्रश्नावर ते बोलून थांबत नाहीत किंवा आपल्यासारखी फेसबुक पोस्ट टाकून कृतीचे खोटे समाधान ते मिळवत नाहीत. ते लगेच कृती करीत होते. साहित्य संमेलनावर मोर्चा, राजपुत्राला निवेदन, नाभिकांचा संप,अशा कितीतरी छोट्या मोठ्या या प्रत्येक बाबतीत ते कृती करतात . क्रियावान या पंडित: या उक्तीप्रमाणे ते खरे पंडित आहेत.
७) शेतकऱ्यांचे होणारे शोषण हे त्यांनी प्रभावीपणे मांडले. शरद जोशी आणि इतरांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा तात्त्विक पाया महात्मा फुलेंनी घातला. त्यातून शेतकरी वर्गात जागृती निर्माण झाली.
८) ब्राह्मणी व्यवस्था व कर्मकांड रूढी या गरीबांचे शोषण करायला कसे हातभार लावतात? हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले त्यातून शोषणाविरुद्ध लढताना तथाकथित धर्म व शोषक पुरोहितशाही याविरुद्ध लढावे लागेल. हे महात्मा फुलेंनी चळवळीला भान आणून दिले. हे त्यांचे वेगळे योगदान आहे.
९) आज शिक्षणानेच विकास होईल ही सर्व तळातल्या जातीत निर्माण झालेली आकांक्षा, दलित आदिवासी भटके यांच्यात झालेली जाणीव जागृती, तळातून झालेली राजकीय घुसळण, धर्मसत्तेला दिले गेलेले आव्हान आणि शेतकरी आंदोलने हे त्यांनी मांडलेल्या तर्कावर विकसित झालेल्या प्रक्रिया आहेत
१०) डावे धर्माला झोडपतात आणि सामान्य माणसापासून तुटतात.कार्यकर्ते समुहापासून तुटणे शोषक असलेल्या व्यवस्थेला हवेच असते. महात्मा फुलेचे वैशिष्ट्य हे की त्यांनी धर्माचे ठेकेदार झोडपले आणि माणसातील आदिम धर्माची भूक जाणून सत्यधर्म ही दिला. हा विवेक आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवा.
११) कार्यकर्ते लेखनाला महत्व देत नाहीत पण फुलेंनी इतक्या गर्दीच्या आयुष्यात लेखन ही केले. कविता, नाटक वैचारिक सर्वप्रकारे लिहिले. त्या लेखनातून त्यांनी शोषण कसे होते ? हे समजून सांगितले आणि व्यवस्था सहजपणे कसे लुटते हे कसब उलगडून सांगितले. धर्मसत्तेची फसवणूक त्यांनी पुढे आणली. लेखनाचे महत्व त्यांच्याकडे बघून पटते. लिहिण्याला वेळ नाही हे सांगणाऱ्या सर्वांसाठी हे महत्वाचे आहे. पुन्हा साहित्यिक वर्गाला साहित्य कोणासाठी लिहायचे असते हे लक्षात आणून दिले. आजचा साहित्यातील विद्रोही सूर फुलेंच्या चिंतनाचा आविष्कार आहे.
१२) आपल्याला एखादी गोष्ट पटली असेल तर जगाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता उभे राहण्याची हिंमत त्यांनी मला दिली. त्यासाठी सामाजिक बदनामी, हल्ले याचा विचारही मनात आणला नाही. ही हिंमत फुले मला देतात.
१३) जे कार्यकर्ते आहेत ते संसाराकडे दुर्लक्ष करतात आणि जे संसारात यशस्वी असतात ते समाजाकडे दुर्लक्ष करतात. पण फुले एकाचवेळी उद्योजक होते आणि कार्यकर्तेही होते. यशस्वी उपजीविका करूनही तुम्ही सामाजिक काम करू शकता हा मध्यमवर्गासाठीचा सांगावा मोठा आहे.
१४) व्यक्तिगत आयुष्यात ते माणूस म्हणून उंच होते. पुरोहितशाहीवर तुटून पडताना त्यांनी त्या जातीतील व्यक्तींचा तिरस्कार केला नाही, उलट त्यातून सहकारी उभे केले. हा विवेक आजच्या पुरोगाम्यांनी शिकण्यासारखा आहे हे मला भावते.
१५) घरात घुसलेल्या मारेकऱ्यांना माफ करण्याइतके मोठे मन व करुणा मला प्रेरक वाटते. संघर्ष करताना शत्रुत्व होणार नाही याची जाणीव करून देते
१६) विधवा महिलांसाठी चे त्यांचे काम खूप दिशादर्शक आहे. या महिलांना आधार देण्याची प्रेरणा फुले मला देतात.
१७) विचार करा पण कृती त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे हे फुलेंनी मला शिकवले. कृती करण्याची आणि जगाविरुद्ध ठाम उभे राहण्याची धमक ते आपल्याला देतात म्हणून महात्मा फुले मला खूप भावतात....
माझ्या घराच्या hall मध्ये त्यामुळे फक्त एक आणि एकच फोटो लावलेला आहे तो म्हणजे महात्मा फुलेंचा.