पुण्यात उच्चशिक्षित दांपत्याची भोंदूबाबाकडून १४ कोटींची फसवणूक

Update: 2025-11-07 01:02 GMT

मी अत्यंत अस्वस्थ आहे...

अंजली डोळस आणि दीपक डोळस या दांपत्याची दिपक खडके आणि वेदिका पंढरपूरकर या कथित बाबा-साधू माणसाने आणि त्याच्या शिष्येने १४ कोटींनी फसवणूक केली.

अंजली आणि दीपक या दोघांनाही मी अमरावतीपासून ओळखते. अंजली डोळस पूर्वाश्रमीची अंजली कसबेकर ही माझ्या चुलत मामींची सख्खी भाची. नातं तसं खूपच दूरचं पण परिचय खूप. मी अमरावतीला असताना अंजू ताईची खूपदा भेट होत असे. अतिशय सौम्य आणि सात्विक व्यक्तिमत्व. तीने एमएससी केलं होतं. ती गणिताच्या टयुशन्स घेत असे. तिचा नवरा इंजिनिअर.

तिच्या लग्नानंतर तिच्याशी फारसा संबंध राहिला नाही. तिला पहिली मुलगी झाली ती मतिमंद झाली. ते कळल्यावर अंजूताई आणि तिचा नवरा कोशातच गेले. ते लंडनला स्थायिक झाले. मग खूप वर्षांनी परत दुसरं अपत्य नीट होईल म्हणून यांनी मूल होऊ देण्याचा निर्णय घेतला. तर दुसरी मुलगी झाली पण तिच्या डोक्यावर केसच नाही... ती वेगळी दिसत असे...

मुली मोठ्या होत होत्या. त्यांचं भारतात संगोपन नीट होईल म्हणून दोघं पुण्यात आले. तिथे यांची भेट एका उपासना मंडळातून दीपक खडके नावाच्या भोंदू बाबाशी झाली. हा बाबा म्हणे नाशिकहून पुण्यात येतो. या बाबाने त्यांना त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर जी महात्मा सोसायटीत राहते आणि तिचा नवरा कुणाल पंढरपूरकरशी करुन दिली. त्या वेदिकाच्या अंगात शंकर महाराज येतात असं दीपक खडकेनं सांगितलं.

या दोन्ही मुली पूर्ण बऱ्या होऊ शकतात असं वेदिका पंढरपूरकर म्हणाली. पण यांच्या पत्रिकेत दोष आहे यांनी आपल्या अकाऊंटमध्ये पैसे ठेवू नयेत आणि नावावर संपत्ती ठेवू नये तेव्हाच या मुली बऱ्या होतील असं म्हणत दिपक डोळस आणि अंजली डोळस यांना त्यांची सर्व संपत्ती विकून वेदिकाच्या अकाऊंटला पैसे जमा करायला सांगितले.

लंडनमधलं घर, पुण्यातलं डहाणूकर कॉलनीतलं घर, सोनं, एफडी अशी चौदा कोटींची संपत्ती विकून डोळस दांपत्य आता कंगाल झालं आहे. ही सर्व संपत्ती दीपक खडके आणि वेदिका पंढरपूरकरने हडप केली आहे. डोळस दांपत्य पूर्णपणे रस्त्यावर आले आहेत. एबीपी माझाने ही स्टोरी दाखवली आहे. तेव्हाच ते आम्हाला कळलं.

या सर्व प्रकरणामुळे मनात निर्माण झालेले काही प्रश्न आणि विचार आपल्यासोबत शेअर करतेय.

हे वाचल्यावर आपल्या सर्वांचीच पहिली प्रतिक्रिया हीच असणार आहे की, अरे एवढी इंजिनिअर, एमएससी शिकली सवरलेली माणसं अशी कशी वागतात. इतकी वेडयासारखी वाहवत कशी जाऊ शकतात. हा तर्कशुद्ध युक्तिवाद अगदी बरोबर आहे. पण नुसत्या तर्कावर आयुष्य चालत नाही. माणूस भावनेवर जगतो आणि अनेकदा तो इतका व्याकूळ, अगतिक होतो की त्याला भान राहत नाही. त्याचा विवेक संपतो. तर्क नष्ट होतो.

सर्व धर्मातले भोंदू (बाबा-बुवा पाद्री, मुल्ला मौलवी) हे माणसांच्या भयाचा, विकलतेचा, व्याकूळतेचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घ्यायला बसलेलेच आहेत. धर्म वाईट नाही पण धर्मातले हे दलाल मोडून काढले पाहिजे.

आपल्या भारतीय राज्यघटनेत नीतीनिर्देशक तत्वांमध्ये नागरिकांची आणि राज्याची कर्तव्यं सांगितली आहेत. त्यात राज्याचे कर्तव्य नागरिकांमध्ये बुद्धिप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी विचारांचा प्रसार करणे हे आहे. तसेच नागरिकांनी बुद्धिप्रामण्याचा स्वीकार करणे हे सांगितले आहे. त्या दृष्टीने सुजाण लोकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गाडगेबाबा, नरेंद्र दाभोलकर, हमीद दलवाई, जावेद अख्तर सारखे लोक ते करताहेत.

ही सगळी लढाई ही दु:खाची आहे. भयाची आहे. विकलतेची आहे. माणसं कुठल्या ना कुठल्या भयाने ग्रासली असतात. मृत्यूचं भय, आजारपणाचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, यात विकलतेतून ते या बुवा बाबांच्या नादी लागतात. आणि दीपक डोळस- अंजली डोळस सारखे सुशिक्षित लोक जेव्हा या बुवा-बाबांच्या नादी लागतात तिथे अशिक्षित, गोरगरिब लोकांच्या काय कथा असतील कल्पना करवत नाही.

नरेंद्र दाभोलकरांची जेव्हा मी आयबीएन-लोकमतला मुलाखत घेतली होती, तेव्हा ते मला अत्यंत मौलिक बोलले होते. ते म्हणाले, की अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हा मूलत: करुणेचा विचार आहे. कारण लोक भयभीत असतात, त्याकडे करुणेनं बघण्याची गरज आहे... एबीपी माझा च्या बातमीत डोळस दांपत्याच्या मतिमंद मुलींकडे बघवत नाही.

तेव्हा आपल्या आसपास, कुटुंबात मतिमंदत्व, आजारपण, कर्ज अश्या समस्यांनी ग्रस्त लोक असतील तर स्वत:हून थोडं लक्ष घाला. मदतीचा हात पुढे करा. क्वचित कठोर शब्दात सांगा. त्यानंतरही ऐकले नाही तर बघता येईल. पण त्यांना अशा बाबा-बुवा, मौलवी, पाद्री यांच्यापासून वाचवणे हे आपलेही कर्तव्य आहे. कोशातून बाहेर या....

परत एकदा भोंदू बाबा आणि त्याच्या शिष्येचं नाव लिहितेय...दीपक खडके आणि वेदिका कुणाल पंढरपूरकर.. दोघेही फेसबुकवर आहेत. सावध राहा... इतरांना सावध करा.

वसुंधरा काशीकर

(लेखक, निवेदक, मुलाखतकार, स्वतंत्र पत्रकार, भाषा सल्लागार )

(साभार -सदर पोस्ट वसुंधरा काशीकर यांच्या फेसबुक भिंतीहून घेतली आहे)

Similar News