"सत्ता नाही मिळाली तरी चालेल मात्र विचारांची साथ आम्ही सोडणार नाही" - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
"भाजपकडे पैसा आणि संख्याबळ आहे, पण आमच्याकडे विचार आणि घटनेचे मूल्य आहे. जनतेने मतदान करून भाजपला धडा शिकवावा." महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने मॅक्स महाराष्ट्रच्या मुलाखतीत काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडले रोखठोक मत
Maharashtra Municipal Elections 2026 महाराष्ट्रातील आगामी २०२६ च्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ज्येष्ठ पत्रकार मुश्ताक खान यांनी घेतलेली रोखठोक मुलाखत. या मुलाखतीत भाजपला मुंबईसह राज्यातील महापालिकांमध्ये कसे रोखायचे? यावर सपकाळ यांनी भाष्य केलं आहे. यावेळी पैसा, भीती, ED-CBI चा गैरवापर आणि सत्तेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील नेत्यांना फोडले जात आहेत. भाजप हा 'त्रिकुट सरकारचा गँग' असून भ्रष्टाचार, ध्रुवीकरण आणि जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचे काम करतो. अशी टीका सपकाळ यांनी भाजपावर केली. निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत असून, ते 'सरकारी कार्यक्रम' बनले आहे, असं देखील ते म्हणाले.
महापालिका निवडणुकांसाठी मुंबईत वंचित बहुजन आघाडी सोबत काँग्रेसने युती केली. ही युती आतापर्यंत कुणामुळे होत नव्हती ? असा सवाल केला असता सपकाळ यांनी युती झाली हे सध्या महत्त्वाचं आहे असं उत्तर दिलं.
मुंबई महापौर कोण?
मुंबईच्या महापौरपदाबाबत बोलताना सपकाळ यांनी ठामपणे सांगितले की, "मुंबईचा महापौर मराठी असावा, महाराष्ट्रीयन असावा. इथे बाहेरचे लोक आणून मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही." याशिवाय भाजपच्या हिंदी लादण्याच्या धोरणाचा आणि 'गायीच्या शेणावर' आधारित धोरणांचा विरोध करण्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
काँग्रेसची ताकद आणि भविष्य
सपकाळ यांनी काँग्रेस हा संविधान, समाजवाद आणि सर्वसमावेशकतेच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. तसेच "भाजपकडे पैसा आणि संख्याबळ आहे, पण आमच्याकडे विचार आणि घटनेचे मूल्य आहे. जनतेने मतदान करून भाजपला धडा शिकवावा." असं या मुलाखतीत म्हटलं आहे. पाहा ही मुलाखत