अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आरोपीला धडा शिकवेन'

पुण्याच्या राष्ट्रीय महिला खेळाडू वैष्णवी ठुबेला झालेल्या मारहाणीचा सर्व स्तरातून निषेध केला जात असताना आरोपीला तातडीने शिक्षा झाली नाही तर मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा मनसेने दिला आहे.

Update: 2021-08-06 11:07 GMT

पुणे : पुण्यात एका राष्ट्रीय महिला खेळाडूला कारचालकाकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणप्रकरणी मनसेकडून संबंधितावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. सोबतच या घटनेबाबत विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहे.

संबधित आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, नाहीतर मनसे त्याला फोडेल अशी प्रतिक्रिया मनसे नेत्या रुपाली पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्तरावरील जुडो रेसलिंगपटू वैष्णवी ठुबे या महिला खेळाडूला पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुमित टिळेकर याने हडपसर परिसरात जबर मारहाण केल्याचा आरोप ठुबे यांनी केला आहे. कार नीट चालवण्यास सांगितल्याचा राग आल्याने वैष्णवी यांना ही मारहाण केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत वैष्णवी ठुबे यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत बीएमडब्ल्यू कार चालक सुमित टिळेकर हा वाहतुकीचे नियम मोडून पाठीमागून भरधाव वेगाने जात होता, त्याचवेळी सिग्नलला गाडी पुढे घेण्यावरुन टिळेकर आणि ठुबे यांच्यात वादावादी झाली. त्याचवेळी सुमित टिळेकरने वैष्णवीला शिवीगाळ केली. आणि लाकडी दांडक्याने तिच्या पाठीवर आणि खांद्यावर मारहाण केली अशी तक्रार वैष्णवी ठुबे यांनी पोलिसात दिली आहे. या मारहाणीत वैष्णवीच्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे.

या प्रकरणावरून मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आरोपीवर तातडीने कारवाई करावी अन्यथा मनसे आपल्या पध्दतीने त्याला धडा शिकवेल असा इशारा मनसेने दिला आहे.

तर या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. सोबतच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रकरणावरून आता राजकिय वातावरण तापू लागल्याने पोलीस नेमकी काय कारवाई करतात याकडे पुणेकरांसह राज्याचे लक्ष लागले आहे.

Tags:    

Similar News