आधी विरोधी पक्षाचा आवाज दडपला जात होता, आता स्वपक्षीयांचा आवाज दडपला जातो- आमदार पवार

Update: 2021-10-09 03:17 GMT

अहमदनगर  :  उत्तर प्रदेशातील लखीमपुर घटनेबाबत खा. वरुण गांधी यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडत न्यायाची मागणी केली, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबाबत खा.सुब्रह्मण्यम स्वामी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यानेही सरकारचे कान टोचले. हे नेते खरं बोलल्याने त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली.त्यांना भाजपने कमिटीवरून काढले, म्हणजे भाजपच्याच लोकांचा आवाज त्यांच्याच पक्षाकडून वेगळ्या पध्दतीने दाबला जातो हे दिसते असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. अहमदनगर येथे मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आतापर्यंत विरोधी पक्षाचा आवाज दडपला जात होता, पण आता स्वपक्षातील लोकांचाही आवाज दडपला जात आहे. हीच भाजपची खरी कार्यपद्धती आणि लोकशाहीची संकल्पना आहे. पण आता अशा गोष्टी देशातील जनतेपासून लपून राहू शकत नाही असंही आमदार रोहित पवार म्हणाले.

राज्यात सुरू असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवाईबाबत बोलताना आमदार पवार म्हणाले की, आता राज्यातील जनतेलाही माहिती झाले की , अशा कारवाया रोजच्याच झाल्या आहेत, त्यामुळे राजकिय सूडबुद्धीने जेवढ्या कारवाया होतील तेवढी ताकद ही ज्यांच्यावर कारवाया होत आहेत, ज्यांच्यावर अन्याय होत आहे अशा लोकांच्या बाजूने तयार होईल असं मला वाटते असं ते म्हणाले.

सोबतच राजकीय हेतुतून होणाऱ्या या कारवाया थांबल्या पाहिजेत, कुठेतरी विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण व्हायला हवे, तिथे काही मतभेद असेल, महाराष्ट्र शासनात काही चुकीची गोष्ट सुरू असेल तर त्यावर चर्चा करू मात्र, जर अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर ही गोष्ट संविधाना, लोकशाहीला धरून नाही असं आमदार रोहित पवार म्हणाले.

विरोधकांना दाबण्यासाठी भाजपची ही नवी पध्दत

जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, राज्यात भाजप कुठेतरी मागे पडले आणि म्हणून विरोधकांना दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून धाडी टाकण्याची नवी पद्धत भाजपने आणली असल्याचा घणाघात आमदार रोहित पवार यांनी यावेळी केला.

Tags:    

Similar News