बंडखोर आमदारांना प्रत्येकी ५० कोटी? राष्ट्रवादीचा सवाल

Update: 2022-06-25 10:34 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला आहे. ४० हून अधिक आमदारांचे समर्थन शिंदे यांना असल्याने शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष निर्माण झाला आहे. मात्र याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या आमदारांचा प्रवास आणि हॉटेलवर होणारा खर्च देखील चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हा सगळा कोट्यवधींचा खर्च कोण पुरवतय याबाबत इन्कम टॅक्स व ED ने चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

महेश तपास यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. “राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडावं, यासाठी काही अदृश्य शक्ती सध्या काम करतायत, त्या अदृश्य शक्तींनी महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे काही आमदार फोडले. त्यांना सर्वप्रथम सुरत येथील हॉटेलमध्ये ठेवलं त्यानंतर मध्यरात्री स्पाइस जेटच्या विमानाने गुवाहाटी नेण्यात आलं, गुवाहाटीमध्ये पंचतारांकीत आलिशान हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन हजारांच्यावर पोलिसांचे संरक्षण त्यांना देण्यात आले आहे. काही आमदारांना चार्टड प्लाईटने बोलावण्यात आलं आहे. या विमानांचा लाखोंचा खर्च आहे आणि दुसरीकडे प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देऊन त्याला फोडण्यात आल्याची चर्चा महाराष्ट्रातील जनतेत आहे, हा आरोप खरा आहे की खोटा आहे हे माहीत नाही. परंतु या आरोपात काही तथ्य असेल तर इन्कम टॅक्स, ईडी विभागाने याची चौकशी केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सरकार अस्थिर करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हा काळा पैसा कोणी पुरवला याची चौकशी केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासह बंड पुकारलेल्या आमदारांकडून राष्ट्रवादीकडून निधी वाटपात भेदभाव केला गेल्याचे कारण दिले जाते आहे. शिवसेना आमदारांना कमी प्रमाणात निधी दिल्याचा आरोप करण्यात येतोय. याबाबत बोलताना महेश तपासे यांनी बंडखोरी झाली, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला हे आता कोणाच्या तरी माथी मारायचा म्हणून राष्ट्रवादीच्या माथी मारायचा केविलवाणा प्रकार आहे, या आरोपात काही तथ्य नाही, असे सांगितले आहे.

Full View
Full View
Tags:    

Similar News