कल्याणमध्ये 'या' कारणाने शिवसेना - भाजपमध्ये जुंपली

कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेकडील आशेळे गावातील मुख्यरस्त्याची मोठी दुरवस्थेवरून शिवसेना भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. शिवसेना आणि भाजपने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहे.

Update: 2021-07-29 13:18 GMT

कल्याण : कल्याण - डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पूर्वेकडील आशेळे गावातील मुख्यरस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. गेली अनेक वर्षे नागरिक या खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यावरील खड्ड्यांना तलावाचे स्वरूप येते. या रस्त्यावरून आता भाजप-सेनेमध्ये जुपंल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या रस्त्याच्या कामाबाबत गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत असल्याचे म्हटलं आहे, मात्र शिवसेना नेत्यांकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून याच रस्त्यावर होमहवन करत भाजपने शिवसेना नेत्यांना सद्बुद्धी मिळो असं म्हणत उपरोधिक आंदोलन केले होतं.

भाजप आमदारांच्या या आंदोलनानंतर शिवसेनेचे उल्हासनगर महापालिकेचे महापौर लिलाबाई आशान , शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण आशान यांनी या रस्त्याची पाहणी केली. यावेळी शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी रस्त्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदारानी आंदोलनाचा स्टंट केलाय असा पलटवार केला आहे. हा रस्ता शिवसेना करणारच असं सांगत शिवसेनेनं आमदारांवर अनेक आरोप देखील केले. या आरोपांना प्रतिउत्तर देत भाजप आमदारांनी नागरीकांसाठी मी रस्त्यावर उतरलो. 2019 ला आशेळे आणि माणोरे रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला. डीपीआरसुद्धा तयार झाला होता. मात्र काम थांबविले गेले. यासाठी मी आंदोलन केले. माझ्या आंदोलनानंतर शिवसैनिकांची झोप उडाली आणि ते पाहणी करण्यासाठी त्या रस्त्यावर गेले असा टोला भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. सोबतच मी मदत करून फोटो काढणे व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणे असे करत नाही. मी पाट्या लावण्याचं काम करत नाही. मी जनतेच्या हिताची कामं करतो असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे.

Tags:    

Similar News