सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंक निकाल: राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मोठा झटका

Update: 2021-11-23 05:25 GMT

सातारा :  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला आहे. 21 पैकी 11 उमेदवार बिनविरोध झाल्याने जिल्हा बँकेच्या 10 जागांच्या निकालांची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, शिवसेना आमदार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई , राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात आमदार शशिकांत शिंदे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे, तर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील विजयी झालेत.

जावळी सोसायटी गटातून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना अवघ्या एका मताने पराभव पत्करावा लागला आहे, तर ज्ञानदेव रांजणे यांनी बाजी मारली. पाटण विकास सेवा सोसायटी गटात सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झालेत. त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले शिवसेना उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. तर कराड सोसायटी गटातून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील विजयी झाले असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव झाला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून आठ वाजल्यापासून निकाल लागण्यास सुरुवात झाली. दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अनेक दिग्गज मंडळींची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली होती.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदानावेळी तणाव पाहायला मिळाला होता. जावळी तालुक्यातील उमेदवार शशिकांत शिंदे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या कार्यकर्त्यांत वाद झाल्याचे चित्र मतदान केंद्रावर पहायला मिळाले होते. पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला

Tags:    

Similar News