राज्यसभा निवडणूक : १२ निलंबित आमदारांसाठी मतदानाची स्वतंत्र व्यवस्था

Update: 2021-09-22 02:52 GMT

राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. ४ ऑक्टोबरला होणाऱ्या या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत विधानसभेतून निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या १२ आमदारांनाही मतदान करता येणार आहे. त्यासाठी त्यांच्या मतदानाची विधानभवनाबाहेरच्या परिसरात स्वतंत्र सोय करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने विधान भवन सचिवालयाला दिले आहेत.

गेल्या विधिमंडळ अधिवेशनात तालिका अधिकारी भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत भाजपच्या १२ आमदारांना १ वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. यामध्ये आशीष शेलार, संजय कुटे, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, पराग अळवणी, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे आणि किर्तीकुमार भांगडिया यांचा समावेश आहे.

या निवडणुकीत काँग्रेसतर्फे रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे, ते बुधवारी सकाळी १०.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर रजनी पाटील दुपारी अडीच वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत.

Tags:    

Similar News