शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोप भोवले, सत्तारांचे मंत्रीपद हुकलं

Update: 2022-08-09 04:38 GMT

गेल्या महिनाभरापेक्षा जास्त काळ रखडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार थोड्याच वेळात होत आहे. या विस्तारात कुणाला संधी मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचे मंत्रीपद हुकल्याची माहित सुत्रांनी दिली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींचे नाव आल्याने सत्तार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने या प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत करावी अशी मागणी केली होती.

दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या दोन दिवस आधी सत्तार यांच्यावर हे गंभीर आरोप झाल्याने त्यांना मंत्रीपद न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आधीच विस्ताराला उशीर झाल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तारात आरोप झालेल्या व्यक्तीला संधी दिली तर विरोधक येत्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरु शकतात या शक्यतेने मुख्यमंत्र्यांनी सत्तार यांना विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात बाजूल ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे दिसते आहे.

प्रकरण काय आहे?

अब्दुल सत्तार यांनी सर्व आरोप फेटाळले असून या प्रकरणाची चौकशी करुन दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणात सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षामध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणात काही अधिकाऱ्यांना अटकही झाली आहे. यामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं आली आहे आणि त्यांना एजंटमार्फत पैसे देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे, असा आरोप होतो आहे. याप्रकरणी आमदार अब्दुल सत्तार यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. एवढेच नाही तर सत्तार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Similar News