मग रातोरात गुजरातचा मुख्यमंत्री का बदलला? सामनातून सवाल

Update: 2021-09-14 04:24 GMT

मुंबई : गुजरातमध्ये भाजपकडून खांदे पालट केल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.याच मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. गुजरात जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली?, असा सवाल सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. दरम्यान कुठं काय बदलायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. असं सामनातून म्हटलं आहे, भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे 'मॉडेल' असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या 'मन की बात'विषयी नेहमीच सर्वांना उत्सुकता असते. ज्या विषयांची कोणालाही कल्पना नसते अशा विषयावर पंतप्रधान मोदी 'मन की बात' करतात. पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेणे कठीण आहे,आणि हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरून स्पष्ट दिसते असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. भूपेंद्र पटेल यांचं नाव ऐकल्यावर 'कोण हे महाशय?' असा प्रश्न बहुतेक सगळ्यानाच पडला.

विजय रूपाणी यांनी राजीनामा दिल्याने पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशा नावांची चर्चा घडवून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत आणि त्यांच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे वाटणाऱ्या पत्रकारांना भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदींनी अवाक केले. 'मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही' हाच संदेश मोदी यांनी दिला असं या अग्रलेखात म्हटले आहे.

Tags:    

Similar News