परमबीर सिंहांच्या हस्तकांकडून साक्षीदारांना धमक्या, तक्रारदार पोलिसाचा आरोप

Update: 2021-08-20 15:10 GMT

मुंबई- परमबीर सिंह यांचे हस्तक त्यांच्याविरोधातील प्रकरणात साक्षीदारांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप कुणी सामान्य नागरिकाने नाही तर एका पोलीस निरीक्षकाने केला आहे. तसेच आपल्या जीवाला परमबीर सिंह यांच्याकडून धोका आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात सर्वात प्रथम पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

पण आता डांगे यांनी पोलीस महासंचालकाना पत्र लिहून परमबीर सिंग यांच्या विरोधात लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रार प्रकरणातील साक्षीदारांना धमकावले जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. परमबीर सिंग यांचे हस्तक साक्षीदारांना प्रत्यक्ष आणि फोन करून धमकावत आहेत, त्यामुळे आपले साक्षीदार हे धास्तावले आहे आणि दहशतीमुळे ते मदत करण्याच्या स्थितीत नाहीत, असा गंभीर आरोपही डांगे यांनी केला आहे. आपण तक्रार केल्यापासून साक्षीदारांचे जबाब नोंदवावे अशी विनंती आपण संबंधित तपास अधिकाऱ्यांना अनेकदा केली होती, असेही डांगे यांनी सांगितले आहे.

तसेच आपण परमबीर सिंह यांच्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर आपल्यावर देखील पाळत ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर परमबीर सिंग यांना मदत करणारे अधिकारी आताही त्यांना फोन करून माहिती पुरवत आहेत, अशा अधिकाऱ्यांना शोधून त्यांची चौकशी करावी, अशी मागणीही डांगे यांनी आपल्या पत्रात केली आहे. आपल्या जीवाला धोका असल्याने दोन दिवसात स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वरचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज करणार आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच आपला अपघाती मृत्यू झाला किंवा कुणी हल्ला केल्यास त्याला सर्वस्वी परमबीर सिंग, भरत शहा असतील असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.



 



 



Tags:    

Similar News