कुठे गेले अच्छे दिन?, शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

Update: 2022-08-29 12:25 GMT

२०१४ मध्ये निवडणुकीला सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने 'अच्छे दिन'ची घोषणा दिली होती. त्यानंतर अच्छे दिन नागरिकांना काही जाणवले नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. २०१९ च्या निवडणुकीत अच्छे दिनचे विस्मरण पडून 'न्यू इंडिया २०२२' चे स्वप्न दाखवले गेले.

आता २०२४ साठी '५ ट्रिलियन इकॉनॉमी' करु असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरे, प्रत्येक घराला शौचालय, वीज, पाणी आणि शंभर टक्के डिजिटल लिटरसी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र यातले कोणतेही आश्वासन शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. केंद्र सरकारने दिलेली आश्वासने आजवर पाळलेली नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली.

यानंतर पवारांनी बिलकीस बानो प्रकरणावरुनही पंतप्रधानांवर टीका केली. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुजरातमध्ये बिल्कीस बानो यांच्यावर अत्याचार झाला, हे देशाला माहीत आहे. त्यांच्या कुटुंबातील लहान मुलांची हत्या केली गेली. कुटुंबातील इतर सदस्यांवर देखील अत्याचार केले गेले. या प्रकरणात सेशन कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी सर्व आरोपींना कठोर शिक्षा दिली. त्यानंतर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही शिक्षा आजन्म होती, असे असतानाही गुजरात सरकारने या सर्व आरोपींना सोडून दिले. तसेच सोडल्यावर त्यांचा जाहीर सत्कार केला. देशाच्या पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट रोजीच्या भाषणात स्त्री वर्गाच्या सन्मानाबद्दल आग्रही भूमिका मांडली. पंतप्रधान ज्या राज्यातून येतात, त्या राज्यातील त्यांच्या विचारांच्या सरकारने स्त्रियांबद्दल अतिशय लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या आरोपींना सोडण्याचा निकाल घेतला, या शब्दात शरद पवार यांनी टीका केली.

त्याचबरोबर तिस्ता सेटलवाड यांच्यावर करण्यात आलेली कारवाईच मुळात चुकीची होती, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. एवढेच नाही तर देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपला सत्ता मिळत नसल्याने ते कायदा तुडवून सरकार ताब्यात घेत आहेत, असाही आरोप शरद पवार यांनी यावेळी केला.

Tags:    

Similar News