बसपाचं शासक बनो अभियान महाराष्ट्राच्या राजकारणात बहन मायावती सक्रीय

Update: 2022-11-06 17:51 GMT


महाराष्ट्राच्या राजकारणात आता आणखी एका पक्ष सक्रीय होत आहे. सातत्याने चांगली मते घेऊनही राज्यात बसपाला हवं तसं यश मिळत नव्हते, विदर्भात तर प्रचार न करताही बसपाला भरभरून मतदान होत असतं, या परिस्थितीचा विचार करून बसपा सुप्रिमो मायावती Mayawati यांनी महाराष्ट्रासाठी शासक बनो चा नारा दिला आहे. मायावतींचा पक्ष आता राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये सक्रीय होणार असून पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस आणि मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 


कांशीराम यांनी महाराष्ट्रातही बहुजनांना सत्ता मिळू शकते असा विश्वास जागवत होऊ शकत है असा नारा दिला होता. बहुजन समाज शासक बनू शकतो असा कानमंत्र कांशीराम ( Kanshiram ) यांनी दिला होता. मात्र महाराष्ट्रातील राजकारण काँग्रेस-NCP, शिवसेना-भाजपा, मनसे- वंचित बहुजन आघाडी यांच्या अवती भोवती फिरत राहिले. बसपा ने सातत्याने सात टक्क्यांच्या आसपास मते घेतली मात्र पक्षाला त्याचे रूपांतर विजयामध्ये करता आले नाही. महाराष्ट्रात पक्षाला मिळत असलेला हा पाठिंबा बघून बहन मायावती यांनी आता पक्षाची रणनिती बदलली आहे. महाराष्ट्रात सत्ता आणण्याच्या दृष्टीने पक्षाची बांधणी, बूथ ते पार्लियामेंट अभियान आणि शासक बनो चा नारा बुलंद करत त्यांनी राज्यातील सर्व निवडणुका लढण्याचे आदेश राज्यातील नेत्यांना दिले आहेत. त्याअनुसार येत्या ९ नोव्हेंबर रोजी मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे पक्षाची मोठी बैठक होत आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आकाश आनंद उपस्थित राहणार आहेत. आकाश आनंद यांच्या उपस्थितीत बूथ स्तरावरच्या बांधणीची आखणी केली जाईल तसेच येत्या काळात ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी कृती कार्यक्रम ही तयार केला जाणार आहे, अशी माहिती बसपाचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप ताजने यांनी दिली आहे. 


राज्यातील सर्वच निवडणुका यंदा बसपा पूर्ण शक्तीनिशी लढणार आहे, साधनांची कमतरता असली तरी निष्ठावान कार्यकर्त्यांचे केडर पक्षाकडे आहे. ज्यांना ज्यांना बहुजनांची सत्ता यावी असे वाटते त्या सर्वांनी बसपाच्या मागे तन-मन-धनाने उभे राहावे असं आवाहन संदीप ताजने यांनी केले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मनसे पेक्षा दुप्पट मते घेणाऱ्या पक्षाची दखल इथल्या मिडिया आणि राज्यकर्त्यांना घ्यावीच लागेल, बसपा आता संघर्षातून सत्तेचा मार्ग शोधेल, तशा पद्धतीची व्यूहरचना पक्षाने केलीय अशी माहिती ताजने यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News